अमरावती : चोरीची दुचाकी विकण्यासाठी घाटलाडकी येथे आलेल्या मध्य प्रदेशातील अट्टल दुचाकी चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. सागर रामु सेलुकर (वय २० वर्ष रा. बेलकुंड ता. आठनेर जि. बैतुल, मध्य प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. २२ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. सागर शेलुकर याने एक दुचाकी चोरली असून ती घेऊन तो घाटलाडकी येथे विकण्याकरीता आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी मिळाली. त्यानुसार, त्याला घाटलाडकी येथून दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याने आधी दुचाकीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिस खाक्या दाखवताच त्याने ती दुचाकी ब्राम्हणवाडा थडी गावजवळील वणी येथून चोरल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेने ब्राम्हणवाडासह मोर्शी पोलिसांत नोंद असलेली दुचाकी चोरीची घटना उघड झाली. त्याच्याकडून दुचाकी चोरीच्या अन्य काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपीच्या घरातून दोन दुचाकी जप्तपोलिसांनी आरोपीच्या मध्य प्रदेशातील बेलकुंड येथील घराची झडती घेतली असता तेथे कागदपत्र नसलेल्या चोरीच्या दोन दुचाकी आढळून आल्या. त्या दुचाकी त्याने नेमक्या कुठून चोरल्या, याबाबत एलसीबी तपास करीत आहे. त्याच्याकडून आतापर्यंत २ लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याला ब्राम्हणवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एलसीबीचे निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार, अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, सागर नाठे, शांताराम सोनोने, मंगेश मानमोडे, सागर धापड यांनीही कारवाई केली.