लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जन्माचा असो वा विवाहाचा वाढदिवस, केकला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र सतत अस्मानी संकटाशी चार हात करणाऱ्या शेतकऱ्यांकडे कुठून येणार केक? कोरोनाने तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ती व्यथा शासनापर्यंत पोहचविण्यासाठी मोझरी येथे केकऐवजी कांदा कापण्यात आला. हे अनोखे बर्थ डे सेलिब्रेशन समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे.मोझरी येथील एका कास्तकाराच्या मुलाने कांदा नासाडीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क आपला पंचविसावा वाढदिवस केकच्या जागी कांदा कापून साजरा केला.कांदा पीक ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले. कांदा सडायला लागला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो भाव असलेला कांदा आज सात ते दहा रुपये प्रतिकिलो दराने विकण्याची वेळ कास्तकारांवर आली आहे. परिणामी खिशात येणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे कास्तकार चिंतेत आहे. त्या अनुषंगाने उजव्या हाताने अपंगत्व असलेला तुषार गवळी याने आपला वाढदिवस चक्क केकच्या जागी कांदा कापून साजरा केला. दिवस कोणताही असो, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत. त्यांच्या समस्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे तो म्हणाला.
'त्याने' कांदा कापून केले बर्थ डे सेलिब्रेशन; अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी येथील युवकाची शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 2:07 PM