कोरोनायोद्ध्याचे आत्मघाती पाऊल, परिसरात हळहळ
चिखलदरा (अमरावती) नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
सहा महिन्यांपासून तालुक्यातील काटकुंभ व परिसरात कोरोनायोद्धा म्हणून प्रत्येकाच्या मदतीला धावणाऱ्या २८ वर्षीय युवकाने रविवारी सायंकाळी ६ वाजता अचानक आत्मघाती निर्णय घेतला. जगाचा निरोप घेताना त्याने मोबाईलवर अंतिम यात्रेचे स्टेटस ठेवले आणि अनेकांची माफीदेखील मागितली. भंडारा, गोदिया असो की राजस्थान, मध्यप्रदेश, कुठेही त्याच्या ओळखीचे वरिष्ठ अधिकारी, गावपातळीपासून केंद्रीय स्तरावरील नेते, राजकीय मंडळी यांच्याशी ओळखकुठेही त्याची ओळख. कोणच्याही कामात पडणे हाच त्याचा धर्म. त्यामुळे त्याच्या मृत्यूने मेळघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रोशन रामेश्वर आठवले (रा. खामला मध्यप्रदेश, ह.मु. काटकुंभ व गौरखेडा कुंभी, परतवाडा) असे मृत युवकाचे नाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा माजी प्रचारक ते मेळघाटातील कोरोनायोद्धा असा त्याचा प्रवास झाला होता. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभनजीक असलेल्या खामला येथील रोशन शेतमजूर कुटुंबातील. त्याने हॉटेलात काम करून परतवाड्यात शिक्षण घेतले. यादरम्यान असंख्य ओळखीच्या तसेच अनोळखी लोकांच्या मदतीला तो धावला. मोबदल्याची अपेक्षा न बाळगता सहा महिन्यांपासून तो अहोरात्र कोरोना रुग्णांसाठी धडपडत होता. रात्रंदिवस रुग्णांना मदत करीत होता. मात्र, वैयक्तिक जीवनातील एका प्रसंगाने टोकाचे पाऊल घेण्यास त्याला भाग पाडले. रविवारी सायंकाळी ६ वाजता कोविड सेंटरमध्येच झोपेच्या गोळ्या घेऊन तो कायमचा झोपला. त्याला वाचविण्याची धावपळ निरर्थक ठरली.
बॉक्स
पोलिसांत तक्रार,परिसरात हळहळ
रोशनच्या आत्मघाती पाऊल उचलण्याचा त्याला भाग पाडणाऱ्यांविरुद्ध चिखलदरा पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचे जावई सहदेव बेलकर यांनी सांगितले. दुसरीकडे त्याच्याशी जुळलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिक या घटनेने हादरून गेले आहेत.
बॉक्स
कल तेरा यार कफन मे लिपटा मिल जाये.....
रोशनने आत्मघाती पाऊल उचलण्यापूर्वी त्याने मोबाईलमध्ये ‘ऐसी जिंदगी तुम मुझसे शिकवा ना कर, ये क्यो न हो कल, तेरा यार कफन में लिपटा मिल जाये’ हा स्टेटस आणि अनेकांना माफीचे मेसेज टाकले होते.