त्रस्त युवकाकडून आत्मदहनाची धमकी :
नांदगांव पेठ : ग्रामपंचायतीने लेखी उत्तर न देता, निवेदनाला वारंवार केराची टोपली दाखविल्याने मंगळवारी नीलेश रघुवंशी नामक युवकाने चक्क पेट्रोलची बॉटल घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला. उत्तर द्या, अन्यथा आत्मदहन करतो, असा पवित्रा त्याने घेतल्याने नांदगावात खळबळ उडाली होती.
नांदगावपेठमधील बाळापुरे ले-आउट स्थित एका खुल्या जागेवर वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाचे खेळाडू कबड्डी खेळतात. ग्रामपंचायतने त्यांना जागा खाली करण्याची नोटीस देऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरून खेळाडू आणि ग्रामपंचायतीमध्ये वाद निर्माण झाला असल्याचे समजते. सदर जागेवर स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाची इमारत असून, या जागेसंबंधी महाविद्यालय व वीर केसरी मंडळ यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. विभागीय आयुक्तांनी महाविद्यालयाच्या बाजूने निकाल दिला, तर ग्रामपंचायतने जागेसंबंधी मंडळाला ठराव दिला होता. विभागीय आयुक्तांनी जागा खाली करण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. मात्र, या प्रकरणात ग्रामपंचायत हस्तक्षेप करीत असून, पदाधिकाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मंडळाचे पदाधिकारी नीलेश रघुवंशी यांनी केला आहे.
पोलीस संरक्षणात जागा खाली करण्याचा ठराव मासिक बैठकीत घेतला आहे का , अशी विचारणा नीलेश रघुवंशी यांनी केली. मात्र , रघुवंशी यांना ग्रामपंचायतच्यावतीने कोणतेही लेखी उत्तर देण्यात येत नसून, केवळ टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने मंगळवारी पेट्रोलची बॉटल घेऊन ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, अन्यथा मी आत्मदहन करतो, असा पवित्रा घेतला. वृत्त लिहिस्तोवर कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती तसेच पोलीसदेखील घटनास्थळी पोहोचले नव्हते, हे विशेष!
बॉक्स
विभागीय आयुक्तांच्या आदेशांचा सन्मान करीत बाळापुरे ले-आऊटमधील खुल्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता, त्याठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाद करून हाकलून लावले. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांत तक्रार करावी लागली. ही प्रक्रिया ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहीनिशी झालेली आहे. त्या सध्या रजेवर असल्याने नीलेश रघुवंशी यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची मनमानी करीत नसून, ग्रामविकास अधिकारी रुजू झाल्यानंतर त्यांना लेखी उत्तर देण्यात येईल.
- कविता डांगे, सरपंच