जिल्हाधिकारी कक्षासमोरील घटना : भेटण्यास मज्जाव केल्याने संतापअमरावती : जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केल्याने राग अनावर झालेल्या 'आप'च्या कार्यकर्त्याने शिपायालाच चावा घेतल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता घडला. सुभाष आनंद देशमुख (६५, रा. विनायकनगर) असे कार्यकर्त्याचे तर गोविंद चव्हाण (३५ ) असे शिपायाचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. विविध मागण्यांसाठी 'आप'ने आंदोलन छेडले. १० दिवसांपासून कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. त्यामध्ये महेश देशमुख नावाचा युवकही उषोपणास बसला आहे. महेश १० दिवसांपासून घरी गेला नव्हता. त्यामुळे महेशचे वडील सुभाष देशमुख हे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेण्याकरिता शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यांनी जिल्हाधिकारी कक्षासमोर उभा असणारा शिपाई गोविंद चव्हाण यांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती केली. मात्र, सद्यस्थितीत जिल्हाधिकारी भेटू शकत नाही, असे शिपाई चव्हाण यांनी देशमुखांना सांगितले. १० दिवसांपासून मुलगा उषोपण करीत असून अद्याप घरी परतलेला नाही. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई करण्यात येत असल्याचे पाहून सुभाष देशमुख यांचा राग अनावर झाला व त्यांनी चव्हाण यांना पकडून त्यांच्या मानेला चावा घेतला. हा प्रकार घडताच चव्हाण यांनी तत्काळ गाडगेनगर पोलिसांना माहिती देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले. काही वेळात पोलिसांनी पाचारण करुन सुभाष देशमुख यांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईची प्रक्रिया पोलीस करीत आहेत.
'त्याने' जिल्हाधिकाऱ्यांच्या शिपायालाच घेतला चावा
By admin | Published: August 22, 2015 12:36 AM