लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फेसबुकवरून ओळख झालेल्या एका मुलीला पंढरपूर येथील दोन युवकांनी एका महिलेच्या मदतीने अमरावती येथून अकोला येथे नेऊन तेथील बसस्थानकानजीक एका लॉजमध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार २२ ऑगस्ट रोजी घडला होता. या गुन्ह्याचा तपास अमरावती शहरातील एका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
प्रकरणाची फिर्याद एका महिलेने यवतमाळ पोलिसांत नोंदविली होती. त्यावरून एक महिला व दोन अनोळखी युवकांविरुद्ध यवतमाळ पोलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३४२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. तिच्या नात्यातील अमरावती येथील अल्पवयीन मुलीची फेसबुकवरून पंढरपूर येथील रहिवासी असलेल्या आरोपींशी ओळख झाली. त्यांनी अमरावती एमआयडीसीहून अल्पवयीन मुलगी व आणखी एका मुलीसह अकोला गाठले. आरोपींनी एका लॉजमध्ये बंद करून ठेवल्याची माहिती मुलीनेच फिर्यादीला फोनवरून दिली होती. यवतमाळ पोलिसांनी मुलीची सुटका केली होती. या प्रकरणाचा तपास आता अमरावती पोलिसांकडे शनिवारी वर्ग करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.