गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा ग्राफ माघारताच डेंग्यूचे २५, चिकुनगुण्या २ व मलेरियाच्या ६ रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील आऊटस्कड भागात स्वच्छतेची वाट लागल्याने डासांची उत्पत्ती अन् उच्छाद वाढला आहे. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार २५२ नमुन्यांच्या तपासणीत अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत प्रत्येकी एक चिकुनगुण्या रुग्णांची नोंद आहे. डेंग्यूसारखाच असला तरी चिकुनगुण्याचा आजार अनेक दिवस कायम राहतो. हा ताप बरा झाल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम नंतरही होत असल्याने रुग्ण जेरीस आले आहेत. जिल्हाभरात डेंग्यूचे २५ रुग्ण आढळले आहेत. २५२ रक्तजल नमुने तपासणीकरिता पाठविले होते. यामध्ये अचलपूर तालुक्यात ७, चिखलदरा ६, अमरावती ३, चामदूर बाजार ४, नांदगाव खंडेश्वर २, चांदूर रेल्वे १ व तिवसा तालुक्यात एक डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले. मलेरियाचे १,३६,०८६ नमुन्यांच्या तपासणीत सहा रुग्ण आढळून आले. हे सर्व आजार डासांपासून होत असल्याने घराच्या आसपास डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये डेंग्यूची लक्षणे वेगळी डोकेदुखी, अंगदुखी व सौम्य ताप असतो. काही प्रकरणात गंभीर लक्षणे दिसून येतात. रक्तदाब कमी होणे, प्लेटलेटमध्ये कमी येणे याशिवाय १०४ पर्यंत ताप, स्नायू, हाडे आणि सांधेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्यांच्या मागे वेदना होतात, काही रुग्ण एका आठवड्यात बरे होतात, तर काहींमध्ये तीव्र लक्षणे दिसतात.
चिकुनगुनियाचे लक्षण तीव्र सांधेदुखी थंडी वाजून ताप, उलटी, अन्नावरची इच्छा कमी होणे, डोकेदुखी यापैकी कोणतेही एक लक्षण चिकुनगुण्याचे असू शकते. काहीवेळा अंगावर पुरळदेखील येतात. सांधेदुखीमुळे रुग्णाला चालताना त्रास होतो. रक्ताची तसेच अन्य चाचण्या करून चिकुनगुण्याचे निदान केले जाते. काही रुग्ण आठवडाभरात, काही दोन ते तीन महिन्यांत बरे होतात.
तापाच्या आजाराशी जुळतात लक्षणे मलेरियात थंडी वाजून ताप येणे, राहून राहून ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी होणे, पोटदुखी, हगवण, अतिसार, अंगदुखी, शरीरात वेदना होणे, सांध्यामध्ये वेदना होणे, नाडीची गती जलद होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. रुग्णांची तपासणी करून यकृत व लिव्हरचा आकार वाढला आहे का, याची तपासणी केली जाते व रक्ताची चाचणी करून निदान केले जाते.