किचकट प्रक्रिया : दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश अमरावती : दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणानुसार आॅनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या आॅनलाईनमुळे दुर्गम व आदिवासी भागातील पालकांची डोकेदुखी वाढणार आहे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात विविध शाळांत २५ टक्के आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार आहे. शासनाने १० जानेवारी २०१७ रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यातील विनाअनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. २५ टक्के जागांवर प्रवेशासंदर्भात आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, यासाठी शाळांची तालुकानिहाय यादी उपलब्ध करण्यात आली आहे. पालकांना आॅनलाईन प्रवेश अर्ज भरल्यास ५ फेब्रुवारी ते २१ फेब्रवारी ही मुदत राहणार आहे. पहिली लॉटरी २७ व २८ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. पालकांनी विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १ ते ९ मार्च अशी राहणार आहे. शाळांनी विद्यार्थ्यांची जाग रिक्त असल्याचे दर्शविण्याबाबतची मुदत १० ते ११ मार्च यादरम्यान राहणार आहे. दुसरी लॉटरी काढण्याची मुदत १४ व १५ मार्च राहणार आहे. तिसरी लॉटरी २४ मार्च, चौथी लॉटरी ७ एप्रिल व पाचवी लॉटरी १८ एप्रिल काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा जुन्याचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटक, जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला एक लाखापेक्षा कमी, दिव्यांग विद्यार्थ्यासाठी ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या बालकांचे किमान वय पाच वर्षे चार महिने असावे. (प्रतिनिधी)
आॅनलाईनमुळे डोकेदुखी!
By admin | Published: February 04, 2017 12:06 AM