प्रदीप भाकरे/ अमरावती - विद्यार्थी प्रगत केल्याबद्दल राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांकडून राज्यातील १२ हजारांहून अधिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना अभिनंदनपत्र पाठविले जाणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या स्वाक्षरीने जारी होणा-या या अभिनंदनपत्रामध्ये संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांच्या क्रियाशील नेतृत्वाचे कौतुक करण्यात येणार आहे. राज्यात जून २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याच्या परिणामी राज्यात मोठ्या संख्येने १०० टक्के मुले प्रगत झाली आहेत. राज्यातील १२ हजार १५३ शाळांमधील १०० टक्के मुलांनी भाषा व गणित विषयात अपेक्षित संपादणूक पातळी गाठलेली आहे. ८, ९, ११ व १२ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित पायाभूत चाचणीचा मूल्यांकनाच्या आधारावर सरल प्रणालीत त्याचे गुणांकन करण्यात आले. शासनाने यावर्षी मुलभूत क्षमतेत किमान ७५ टक्के व वर्गानुरूप क्षमतेत किमान ६० टक्के मिळाल्यास मुलास प्रगत समजण्याचे निकष ठरविले आहेत. त्या निकषावर आपले शाळा प्रथम भाषा/गणित विषयात प्रगत आहे. आपल्या अथक प्रयत्नाने मिळविलेल्या या यशाबद्दल शासन आपले व आपल्या सहकारी शिक्षकांचे अभिनंदन करीत असल्याचे तावडे यांनी या अभिनंदन पत्रात म्हटले आहे.
अशा राहणार शुभेच्छाप्रगत शाळांच्या मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांना पाठविण्यात येणा-या अभिनंदन पत्रात ‘शाळेत येणारे प्रत्येक मूल त्या इयत्तेकरिता दरवर्षी नवीन असते. आपणास व आपल्या सर्व सहका-यांना पुढच्या चाचणीत तसेच येत्या दरवर्षी असेच यश लाभो, हीच शुभेच्छा’ या मजकुराचा समावेश आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गंत राज्यात घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणी २०१७ मध्ये राज्यातील १२१५३ शाळा प्रगत दिसून आल्या आहेत. २२ डिसेंबरपर्यंत सरल प्रणालीत भरण्यात आलेल्या माहितीनुसार हा दावा करण्यात आला आहे.