चांदूर बाजार : शालेय सत्राच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील जी.आर. काबरा विद्यालयाच्या मुख्याध्यापिकाच अनुपस्थित होत्या. ननगर परिषद उर्दू विद्यालय, जिजामाता विद्यालयासह शिरजगाव बंड येथील शाळेत शिक्षकांची १०० टक्के हजेरी असल्याचे दिसून आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. २८ जूनपासून पहिली ते नववीपर्यंत ५० टक्के तसेच दहावी व बारावीकरिता शंभर टक्के शिक्षक उपस्थितीचे आदेश दिले. शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील विविध शाळां प्रत्यक्ष भेट देण्यात आली. तालुक्यातील अग्रणी शाळा म्हणून ओळखली जाणारी जी.आर. काबरा विद्यालयात शाळेच्या मुख्याध्यापिका स्वतः अनुपस्थित होत्या. २० ते २५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा १०० टक्के हजर होते. मात्र, हजेरी पुस्तकावर दुपारी साडेबारापर्यंत नोंदी आढळून आल्या नाहीत. याबाबत विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्याने उपस्थित शिक्षकांचा सह्या घेण्यास सुरुवात केली. ऑनलाइन शिक्षणाबाबत अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती एका शिक्षकाने दिली. जिजामाता विद्यालय, नगर परिषद उर्दू विद्यालय तसेच नगर परिषद विद्यालय येथे शिक्षक उपस्थिती शंभर टक्के होती. शिक्षकांची बैठक घेण्यात आली. नगर परिषद उर्दू विद्यालयात २९ जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरू होतील, असे मुख्याध्यापक जमील आफताब म्हणाले. पुढील नियोजन तसेच ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक मलवार यांनी दिली. शिरजगाव बंड येथे शिवाजी विद्यालय, जि.प. शाळा येथेसुद्धा शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती होती.