लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरामध्ये कीटकजन्य आजारांचा प्रसार होऊ नये, यासाठी आयोजित आढावा बैठकीत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. पावसाळ्यापूर्वी व सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मोठे नाले व नाल्यांच्या सफाईकामांविषयी अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये झालेल्या बैठकीला सहायक आयुक्त (मुख्यालय), जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा हिवताप अधिकारी तसेच महापालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर आदी उपस्थित होते. बांधकाम विभागाने शहरात मालवीय चौकात तसेच नमुना परिसराजवळ अंबानाला सफाईची कार्यवाही केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत १८ मोठे व १९ लहान नाले साफ करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.अतिवृष्टीमध्ये वाहून येणारा गाळ व कचरा यामुळे नाले तुंबून आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरते. हे नुकसान टाळण्यासाठी तुंबलेले नाले-नाल्या त्वरित मोकळे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या ठिकाणी नाल्या तुटल्या किंवा सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या नाहीत, अशा ठिकाणी झोन स्तरावरील उपअभियंत्यांकडून सोकपीट तयार करण्यात येत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी कालावधीत नाल्याकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यासाठी शहरात फिरणाऱ्या १३६ मिनीटिप्परवर असलेल्या ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच महापालिकेचे दवाखाने, अंगणवाडी केंद्रांवरही आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या.नाल्यात कचरा न टाकण्याची ताकीदशहरातील सांडपाण्याच्या डबक्यांमधील पाण्याचा निचरा करुन घेण्यात आलेला आहे तसेच त्यामध्ये एम.एल.ओ. टाकण्यात आलेले आहे. वेळोवेळी पाण्याचा निचरा करण्याकरिता व तुंबलेल्या डबक्यांमध्ये एम.एल.ओ. टाकण्याकरिता स्पष्ट सूचना स्वास्थ्य निरीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. नाल्याकाठी असलेल्या नागरिकांना त्यांचा कचरा, प्लास्टिक, टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये न टाकण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.शेणखत विल्हेवाटीसाठी पशुपालकांना नोटीसप्रभागातील पशुमालकांना त्यांच्याकडील शेणखताची त्वरित विल्हेवाट लावण्याकरिता नोटीस देण्याचे निर्देश आयुक्तांनी स्वास्थ्य निरीक्षकांना दिले. पावसाळ्यात सर्व प्रभागांतील तक्रार निवारण केंद्र सुरू ठेवण्याबाबत तसेच त्यामध्ये आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्याबाबत कंत्राटदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात पाच स्प्रे पंप व पाच फॉगिंग मशीन कार्यान्वित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
आयुक्तांनी घेतली आरोग्य विभागाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 1:33 AM
शहरामध्ये कीटकजन्य आजारांचा प्रसार होऊ नये, यासाठी आयोजित आढावा बैठकीत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. पावसाळ्यापूर्वी व सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मोठे नाले व नाल्यांच्या सफाईकामांविषयी अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.
ठळक मुद्देविविध विभागांची आढावा बैठक : जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही सूचना