अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे रविवारी घडलेल्या एनआयसीयू विभागातील व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे. स्फोट झालेला व्हेंटिलेटर हा दोन महिन्यांपूर्वीच रुग्णालयाला प्राप्त झाला होता. या घटनेमुळे शिलर हेल्थ केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुरविलेले अमरावती विभागातील सर्वच व्हेंटिलेटर काढून टाकण्याच्या सूचना स्थानिक आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
डफरीन येथील एनआयसीयू विभागातील व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे या ठिकाणी दाखल नवजात शिशूंचे प्राण धोक्यात आले होते. यावेळी आरोग्य यंत्रणेने तत्काळ विभागातील भरती सर्वच ३७ बालकांना बाहेर काढून यातील १२ नवजात शिशूंना शहरातील इतर रुग्णालयांत हलविले होते. परंतु, जो शिशू पूर्वीच व्हेंटिलेटरवर होता, त्याचा मात्र रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील संबंधित घटनेचा २४ तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, ते दोन महिन्यांपूर्वीच शिलर हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुरविले होते. त्यामुळे आरोग्य उपसंचालक अकोला यांनी अकोला, बुलडाणा तसेच अमरावतीत पुरविण्यात आलेले सर्वच व्हेंटिलेटर वापरातून काढण्याचे तसेच त्यांचा वापर बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
अमरावती डफरीन येथील व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याने शिलर हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुरविलेले सर्वच व्हेंटिलेटर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन असे एकूण सहा व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते.
- डॉ. तरंगतुषार वारे, आरोग्य उपसंचालक, अकोला.