नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : पावसाळ्याचे दिवस आणि उच्च न्यायालयात दाखल याचिकेची दखल घेत, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने १५ दिवसांऐवजी केवळ आठवडाभरासाठी राज्यभरातील शेकडो किलोमीटर अंतरावरील स्त्रीरोग, बालरोग तज्ज्ञांना पाठविण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात सोमवारी एकही तज्ज्ञ हजर झाला नव्हता. त्यामुळे केवळ खानापूर्ती करण्यासाठीच मेळघाटातील आदिवासी बालके व मातांच्या जीवाशी खेळखंडोबा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणामुळे बालमृत्यू होतात. अलीकडे मातामृत्यूही होत आहेत. त्यामुळे न्यायालयात पीआयएल दाखल असल्याने आदेशानुसार दरवर्षी शहरी भागातील स्त्रीरोग, बालरोग तज्ज्ञांना पंधरा दिवसांसाठी मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांत अतिजोखमीच्या माता, गंभीर दुर्धर आजाराने ग्रस्त बालक, कुपोषित बालक आदींची तपासणी, औषधोपचार करण्यासाठी पाठविण्यात येते. दि. २७ जून ते ४ जुलै दरम्यान राज्यातील गडचिरोली, सोलापूर, गोंदिया, अहमदनगर, पांढरकवडा, उस्मानाबाद, उल्हासनगर, भंडारा, सोलापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यांतून २६ स्त्री व बालरोग तज्ज्ञांची यासाठी नियुक्ती करण्यात आली. परंतु, केवळ आदेशाचे पालन म्हणून काम केले जात असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी पूर्वीच आरोग्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली होती.
सोमवारी एकही डॉक्टर हजर नाही
धारणी व चिखलदरा तालुक्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आरोग्य केंद्रांत स्त्री व बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती २७ जून ते ४ जुलैपर्यंत करण्यात आली. प्रत्यक्षात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही डॉक्टर दाखल झाला नसल्याची बाब उघडकीस आली. शेकडो किलोमीटरवरील डॉक्टरांची सेवा सात दिवसांकरिता घेण्यात आली आहे. यात गैरहजर राहता येत नाही. यामुळे नजीकच्या जिल्ह्यातून डॉक्टर पाठविले असते, तर ते तातडीने उपलब्ध झाले असते, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.
मेळघाटात पंधरवड्यासाठी दरवर्षी तज्ज्ञ डॉक्टर पाठविले जातात. यावेळी सात दिवसांचे पत्र आले आहे. एकूण २६ तज्ज्ञ आहेत. २७ जूनपासून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती