अमरावती : जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागात हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली आहे. या हाॅटस्पॉट ठिकाण असलेल्या गावांत तसेच परिसरात कोरोना संक्रमितांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आशा सेविका आदी ‘वॉच‘ ठेवत आहेत.
गत काही दिवसांपासून शहरासोबतच कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक गावात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहे. वाढत्या काेरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. यासोबत यासाठी अन्य विभागाचेही सहकार्य लाभत आहे. आजघडीला ग्रामीण भागात १४ तालुक्यांत ६९ हाॅटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट असलेल्या परिसरात, गावांत कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शासन व जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे पालन होते किंवा नाही याची माहिती घेण्यात येत आहे. याशिवाय दैनंदिन माहिती संकलनावर भर दिला जात आहे.
बॉक्स
गृहविलगीकरणातील रुग्णांवर लक्ष
कोरोना संक्रमित आढळून आलेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण गृहविलगीकरणातील आहेत. गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच आहेत की, घराबाहेर फिरत नाहीत. याकडे स्थानिक आशा सेविका, आरोग्य कर्मचारी लक्ष देत आहेत. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.