अमरावती : कोरोना काळात राज्य शासनाकडून निर्धारित करून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आला. ही बाब समोर येताच आरोग्य संचालकांकडून जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांना लेखीपत्र पाठवून दोन दिवसात ३ लाखावर अतिरिक्त करण्यात आलेल्या खर्चाचा लेखाजोखा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याकरीता दोन दिवसाची मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही या विषयावर आरोग्य संचालकांनी लेखी पत्र पाठवून माहिती मागितली होती.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने शासनाकडून ईसीआरपी अंतर्गत जिल्ह्यांना अनुदान मंजूर करण्यात आले होते. जिल्ह्यासाठी ४ कोटी ४९ लाखाचा निधी निर्गमित करण्यात आला होता. हा निधी कुठल्या शीर्षाखाली खर्च करावयाचा याबाबतचा तपशील सुद्धा देण्यात आलेला होता. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात ४ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी प्राप्त असताना ३ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत आरोग्य संचालकांकडे तक्रारी सुद्धा झाल्या आहेत. याची दखल घेत आरोग्य संचालकांनी नाराजी व्यक्त करीत जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांना नोटीस दिली. या नोटीसला उत्तर देण्याची सुचित करण्यात आले असले तरी अद्यापही संबंधित कार्यालयाकडून समर्पक उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी पुन्हा एकदा दोन्ही कार्यालयांना नोटीस बजावली असून दोन दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. अतिरिक्त खर्च कोणत्या शीर्षाखाली करण्यात आला याची माहिती या नोटीस मधून मागविण्यात आली आहे.मग टाळाटाळ कशासाठी
कोरोना काळातील खर्च निर्देशानुसार करण्यात आल्याची आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. मग अद्याप त्याबाबतचा तपशील आरोग्य संचालक कार्यालयांना का पाठविण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.