अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आठ ते दहा उपकेंद्रांत सभापतींच्या दौऱ्यादरम्यान बंद असल्याचे आढळून आल्याने तेथील नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याचा ठराव सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या निर्देशावरून आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच रखडलेल्या आरोग्य केंद्रांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.
आरोग्य समितीची बैठक सभागृहात सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सदस्य सुखदेव पवार, अलका देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, सदस्य व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात कोरोना नियंत्रण करण्याबाबतचा मुद्दा गाजला, लसीकरण प्रत्येक उपकेंद्र स्तरावर सुरू करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. यावेळी सभापतींनी उपकेंद्र, आरोग्य केंद्रांची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
काही दिवसांपूर्वी सभापती व त्यांच्या पथकाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काही आरोग्य व आरोग्य उपकेंद्रांना भेटी दिल्या. दरम्यान आठ ते दहा उपकेंद्र बंद असल्याचे आढळून आले. तेथे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित नव्हते. त्यामुळे तेथे नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करावी, असा ठराव सभापतींनी बैठकीत मांडला.
बॉक्स
जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा
उपकेंद्र स्तरावर नियोजित केलेला लसीकरणाचा कार्यक्रम काही केंद्रांवर अचानक रद्द केल्याने याबाबतचा मुद्दा सभेत अलका देशमुख यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने तसेच अन्य जिल्ह्यांतदेखील लस उपलब्ध नसल्याने लसीची मागणी केल्याचे जिल्हा आरोग्य आधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले. लस प्राप्त झाल्यास पुन्हा उपकेंद्रात लसीकरण सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.