फोटो कॅप्शन : सुनावणी करताना उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी
फोटो पी ०६ धामणगाव
भूसंचय पद्धतीवर शिक्कामोर्तब : ‘आंध्राच्या अमरावती’चा राबविणार विकास पॅटर्न
धामणगाव रेल्वे : कृषी समृद्धी महामार्गाजवळील धामणगाव शहरालगत उभारण्यात येणाऱ्या नव नगरांच्या निर्मितीसाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीच्या मालकांच्या हरकतींवर शनिवारी सुनावणी घेण्यात आली. यादरम्यान ही शेतजमीन भूसंचय पद्धतीने ताब्यात घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नागपूर-मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या तथा धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील ७४ किमी हद्दीतील समृद्धी महामार्गाचे आतापावेतो ७५ टक्के काम पूर्णत्वास आले. या समृद्धी महामार्गालगत धामणगाव शहराजवळील दत्तापूर, आसेगाव, नारगावंडी, जळगाव आर्वी या गाव परिसरातील ५०० च्या आसपास शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे. त्या शेतधारकांनी चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्यासमक्ष हरकती मांडल्या होत्या. त्यातील काही शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाप्रमाणे एकमुस्त रक्कम देण्याची मागणी केली. मात्र, राज्य शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे जिरायती जमिनीला प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये प्रतिवर्ष मोबदला, तर बागायती जमिनीला १ लाख १२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रतिहेक्टर १.५० लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. याशिवाय १० वर्षांपर्यंत प्रतिवर्ष या रकमेत १० टक्के वाढ केली जाणार आहे. सोबतच कृषी समृद्धी केंद्रात २५ टक्के विकसित भूखंड दिला जाईल. या भूसंचय पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. यात ज्या शेतकऱ्याची शेती गेली, त्या शेतजमिनीचे दरवर्षीचा पीक बुडीत मोबदला शासनाच्या ४ जानेवारी २०१७ च्या शासकीय अध्यादेशाप्रमाणे मिळणार असल्याचे सुनावणीदरम्यान सांगण्यात आले.
अशी असतील नव्याने वसविली जाणारी नगरे
तब्बल दोन हजार हेक्टर परिसरात साधारणत: एक लाख लोकसंख्येसाठी यात कंपन्या, मोठे उद्योग, सर्व सुविधायुक्त रुग्णालये, शाळा-विद्यालये या सर्व सुविधा या नव नगरात उभारल्या जाणार आहेत. आंध्र प्रदेशाची राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या धर्तीवर ही नव नगरे राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी दिली.