अमरावती: जिल्ह्यात वर्षभरात कमी झालेले शेतकरी आत्महत्याचे सत्र पुन्हा वाढले आहे. यंदाच्या सहा महिन्यांत तब्बल १५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अस्मानी अन् सुलतानी संकटाचे हे शेतकरी बळी ठरले आहेत. पश्चिम विदर्भात सर्वधिक शेतकरी आत्महत्याअमरावती जिल्ह्यात होत असल्याचे धगधगते वास्तव आहे.
नैसर्गीक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, कर्ज, आजारीपण, मुलामुलींचे शिक्षण, मुलींचे लग्न आदी कारणांंमुळे धीर खचून दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहे. गतवर्षी बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त होत होते. यंदाच्या सहा महिन्यांत अमरावती जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण फेब्रुवारी महिना वगळता वाढतेच आहे. शासन- प्रशासनाचे या दुर्दैवी घटनांकडे मात्र दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची नोंद जानेवारी २००१ पासून घेण्यात येते. या दरम्यान जिल्ह्यात ५०९४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये २५८८ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली तर २४६३ अपात्र ठरली आहे. याशिवाय ४३ प्रकरणे अद्यापही चौकशीकरिता प्रलंबित आहेत.