परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील पोळ्याच्या यात्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याकडील गॅस सिलेंडरचा शनिवार स्फोट झाल्यामुळे दोन वर्षीय बालिकेचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला. ती घटनास्थळीच बेशुद्ध पडली. बेशुद्ध अवस्थेतच तिला उपचारार्थ दवाखान्यात दाखल केल्या गेले. मात्र या दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
भार्गवी उर्फ परी सागर रोही वय दोन वर्ष ही रवींद्र किसनराव रोही वय 65 वर्ष या आपल्या आजोबांसोबत सायंकाळी गावातीलच यात्रेत गेली होती. उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबांसोबत त्या फुगे विक्रेत्याजवळ पोहोचली. त्याच दरम्यान फुगे विक्रेत्या जवळील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. आणि यात भार्गवी गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ दवाखान्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केल्या गेला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल केल्या गेले. पण दवाखान्यात येण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी लोकमतला सांगितले.
गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर काही काळ यात्रेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती काहींनी यात्रा सोडून आपल्या घरची वाट पकडली तर घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. घटनेत दोन वर्षीय चिमुकली ठार झाल्याचे समजताच ठाणेदार सचिन जाधव यांनी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. स्फोटाने यात्रेत खळबळ उडाली नागरिक सैरावैरा पळू लागले. नजीकच्या एका घराच्या स्लॅबला या स्फोटाने तडे गेल्याची माहिती डॉ जितेंद्र मसने व स्थानिकांनी लोकमतशी बोलताना दिली. निष्काळजीपणाने फुगे भरणारा सिलेंडर वापरल्याने संबंधित विक्रेताविरुद्ध पोलीस प्रशासनाची वृत्त लिहितोवर कारवाई सुरू होती
शिंदी बुद्रुक येथे तान्हा पोळा यात्रा असते फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. पुढील तपास सुरू आहे. - सचिन जाधव, ठाणेदार, पथ्रोट