१८ व्या शतकातील महत्त्वपूर्ण रेकॉर्ड : अभिलेखागार कक्षातील कागद जीर्णअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखागार कक्षात १८ व्या शतकापासूनचे शासनाचे महत्त्वपूर्ण २७ लाख ३२ हजार ७०० दस्तऐवज ठेवण्यात आले आहेत. मात्र, या अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन न केल्यामुळे दीडशे ते २०० वर्षांचे कायमस्वरूपी रेकॉर्ड खराब होण्याच्या मार्गावर आहे. स्पर्श करताच तुकडे पडतात, अशी अवस्था या दस्तऐवजांची झाली आहे. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे रेकॉर्ड जीर्ण होत असताना शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष कायम आहे. अभिलेखागार विभागात जिल्ह्यातील १०० ते १५० वर्षांपूर्वीच्या स्टेशन डायऱ्या, रेफ्युजी रजिस्टर, फेरफार रजिस्टर, तगाई, कूळ, सिलिंग, भूसंपादन, जमीन वाटप, जमीन अधिग्रहण, अकृषक प्रकरणे असे कायमस्वरूपी रेकॉर्ड आहे. या कागदपत्रांचे आयुष्य संपुष्टात आल्याने ते केव्हाही नष्ट होऊ शकते. मात्र, हे रेकॉर्ड जनतेच्या दृष्टीने मात्र महत्त्वाचे आहे. अनेकदा रेकॉर्ड उपलब्ध नाही किंवा फाटले असल्याच्या अभिप्रायामुळे अनेकांना नोकरीसह विविध संधी गमवाव्या लागल्या आहेत. वास्तविक हे सर्व रेकॉर्ड ‘स्कॅन’ करून त्याची कायमस्वरूपी ‘हार्डडिक्स व सीडी’ तयार करणे महत्त्वाचे आहे. हे रेकॉर्ड स्कॅनिंग करून सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह करून ‘सॉर्ट’ करता येते. रेकॉर्ड स्कॅनिंगसोबत संबंधित फाईलचे नाव व कामाच्या अभिलेखाबाबतची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये साठवता येऊ शकते. या रेकॉर्डचे जतन करण्याबाबत २ जुलै २०१२ चे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र शासनाची मंजुरी नसल्यामुळे हे बहुमूल्य रेकॉर्ड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. (प्रतिनिधी)तालुक्यातील १९.६३ लाख दस्तऐवजांचा समावेशया कक्षातील अभिलेखागार कक्षात १३ तालुक्यांतील ६,५४६ अभिलेख आहेत. ही पानांची संख्या १९ लाख ६३ हजार ८०० इतकी आहे. यामध्ये अमरावती तालुक्याचे ६३३ अभिलेख, भातकुली ३४५, नांदगाव ३८९, चांदूररेल्वे ७४०, तिवसा ५७२, मोर्शी ७१५, वरूड ५३६, अचलपूर ७७१, चांदूरबाजार ७०७, दर्यापूर ५७४, अंजनगाव ३९१, धारणी ८५ व चिखलदरा तालुक्यातील ८८ अभिलेख्यांचा समावेश आहे.