अमरावती : जिल्ह्यात पहिल्यांदा सार्वत्रिक दमदार पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरु असल्याने चांदूरबाजार तालुक्यात करजगाव मार्गावरील शिरजगावनजीकच्या नाल्याला पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याशिवाय कुऱ्हा (देशमुख) येथील पुलावरून पुराचे पाणी वाहून गेल्याने करजगाव, कुऱ्हा, लाखनवाडी, कोंडवर्धा या गावांची वाहतूक खोळंबली. वरूड तालुक्यात मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेंदूरजना घाट येथील नाल्याला पूर आला व तिवसाघाट, शेंदूरजनाघाट गावांची वाहतूक खोळंबली होती.
याशिवाय देवना आणि जीवना नदीला पूर आल्याने दुथडी भरून वाहत होत्या. वरूड येथील चुडामन नदीच्या पुराचे पाणी काठालगतच्या शेतांत पाणी साचले. जिल्ह्यात पावसाने तीन घरांची पडझड झाली. याशिवाय नुकत्याच पेरणी झालेल्या शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२.३ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.