अमरावती : जिल्ह्यात ५ जुलैपासून सुरु झालेली पावसाची रिपरीप अद्याप थांबलेली नाही. २४ तासांत सरासरी २९.६ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टी झाली, यासह १४ महसूल मंडळात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. यामध्ये वरुड तालुक्यात एकजण वाहून गेला, शेकडो घरांची पडझड झालेली आहे. अनेक घरात पुराचे पाणी शिरले, याशिवाय हजारो हेक्टर शेतीमध्ये पाणी साचून शेताचे तळे झालेले आहे.
सतत तीन आठवड्यांपासून होत असलेल्या पावसाने प्रकल्पांत नियोजित साठा पूर्ण झाल्याने विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळेदेखील नदी-नाले प्रवाहीत झालेले आहे. ‘महावेध’च्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात धामणगाव तालुक्यात ८०.२ व चांदूर रेल्वे तालुक्यात ७१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. या तालुक्यासह अन्य तालुक्यातील १४ महसूल मंडळांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याशिवाय कित्येक मंडळात ६० ते ६४ मिमी दरम्यान पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे.