अमरावती : ४८ तासांत ७२ महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीनेे पश्चिम विदर्भातील नदी-नाल्यांना पूर येऊन काठालगतची ६४८ हेक्टर शेतजमीन खरडल्या गेली. याशिवाय बांध फुटणे व शेतात पाणी साचल्याने किमान १,१७,२०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे.
या आपत्तीमुळे वीज पडून अमरावती जिल्ह्यात दोघांचा मृत्यू तर अंगावर भिंत पडून बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाले आहे, याशिवाय अमरावती जिल्ह्यात आठ जण जखमी झालेले आहे. १८ तारखेला ६७ व १९ तारखेला झालेल्या पावसाने ५ असे एकूण ७२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, तूर व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
या संततधार पावसाने लहान-मोठी १४ जनावरे मृत झाली. याशिवाय ३८४ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३०७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात २७६ मिमी पाऊस पडला. ही ८९.३ टक्केवारी आहे. पावसाची अद्याप ११ टक्के तूट आहे. मागच्या वर्षी याच दिनांकाला ४३६ मिमी पावसाची नोंद झाली होती.
जिल्हानिहाय बाधित पिकांचे क्षेत्र
विभागात दोन दिवसात अमरावती जिल्ह्यात ३२२९ हेक्टर, अकोला जिल्ह्यात १४८०७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात १३३३ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ६१६८ व बुलडाणा जिल्ह्यात ९२२१३ हेक्टरमधील सोयाबीन, तूर, कापूस, उडीद व मूग पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आहेत.
या महसूल मंडळात अतिवृष्टी
१८ तारखेला अमरावती जिल्ह्यात ६, अकोला ९, यवतमाळ ३३, बुलडाणा २० तसेच १९ तारखेला बुलडाणा जिल्ह्यात ५ असे एकूण ७२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सध्याही येलो अलर्ट असल्याने काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.