चांदूर बाजार : तालुक्यात रविवारी दुपारी सलग दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठा कहर केला. महावेधच्या नोंदीनुसार चांदूर बाजार महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामुळे शेकडो एकर शेतातील पिके पाण्याखाली गेली. अनेक गावांना याचा जोरदार फटका बसला. यात जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात पावसाने थोड्याफार प्रमाणात हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवली. इतकेच नव्हे तर कडक उन्हामुळे पिके कोमजून गेली होती. अशातच पावसाने रविवारी अचानक दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये सामाधान व्यक्त करण्यात येत असतानाच या पावसाने विक्राळ रूप धारण करून शेतातील सर्व पिकेच वाहून नेली.
महावेधच्या नोंदीनुसार, रविवारी तालुक्यात सात महसूल मंडळात झालेल्या पावसाची सरासरी ४०.४५ मिलिमीटर आहे. यात चांदूर बाजार मंडळात सर्वाधिक ६६.३ मिमी, तर सर्वात कमी ब्राह्मणवाडा थडी ८.५ मिमी, बेलोरा ५६.५ मिमी, शिरजगाव कसबा ३६.५ मिमी, करजगाव ३९.८ मिमी, आसेगाव ३३.३ मिमी, तर तळेगाव मोहना ४२.३ मंडळात मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तालुक्यात एकूण २८३.२ मिलिमीटर पाऊस कोसळला. सरासरी ४०.४५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी याच तारखेस एकूण ४२२.६८ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. एकंदरीत पाहता तालुक्यात केवळ ५० टक्केच पाऊस झाल्याची नोंद आहे.
तालुक्यात दोन तासात झालेल्या मुसळधार पावसाने अचानक विक्राळ रुप धारण केल्यामुळे हिरुळ पुर्णा येथील अनेक घरात पाणी शिरल्याने घरातील धान्यासह इतर साहित्यही पाण्यात वाहून गेले. तर हिरुळ व सर्फाबाद शिवारातील शेकडो एकर शेतीमधील पिकात पाणी शिरल्याने सर्व शेतांना तलावाचे स्वरुप आले होते. काही शेती खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचसोबत तालुक्यातील इतरही गावातील नदी व नाल्या काठच्या गावातील शेतीला या पावसाचा जबर फटका बसला.