मोर्शी : दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून, सर्वत्र पावसाने कहर केला आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या १३ दरवाजे असलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पात ५० टक्के म्हणजे २७८.६१ दशलक्ष घनमीटर पाणी आहे.
धरणाची पाणी साठवण क्षमता ५६४.०५ दलघमी व ३४२.४९ मीटर आहे. गतवर्षी जुलै महिन्यात अप्पर वर्धा धरण प्रकल्पात ३८६.३७ दलघमी म्हणजेच ६८.५० टक्के पाणी होते. जिल्ह्यातील वरूड, मोर्शी तालुक्यात कितीही जोरदार पाऊस झाला तरी त्याचा फायदा अप्पर वर्धा प्रकल्पाला होत नाही. कारण अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे मध्य प्रदेशात आहे. जर मध्य प्रदेशात तसेच सालबर्डी व सातपुड्याच्या पर्वतरांगात मुसळधार पाऊस कोसळला, तरच अप्पर वर्धा प्रकल्पातील पाण्याचा स्तर वाढतो. अप्पर वर्धा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अप्पर वर्धा प्रकल्प ओव्हर फ्लो व्हायला बराच अवकाश आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये मध्य प्रदेशात जोरदार मुसळधार पाऊस झाला, तरच ऑगस्ट महिन्यात अप्पर वर्धा प्रकल्प पूर्णपणे भरू शकतो.
प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यानंतर ओसांडून वाहणाऱ्या प्रपाताचे रोमहर्षक नैसर्गिक सौंदर्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी दरवर्षी या प्रकल्पावर लोकांची गर्दी उसळत असते परंतु या दोन-तीन दिवसांत सर्वत्र पाऊस पडत असूनसुद्धा अप्पर वर्धा धरण सद्यस्थितीत ५० टक्क्यांवर असल्याचे येथील प्रकल्प देखरेख अधिकारी गजानन साने यांनी सांगितले.