अमरावती : पश्चिम विदर्भात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ३८ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. या आपत्तीमध्ये तीन व्यक्ती व २२ जनावरांचा मृत्यू झाला. शिवाय नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे ११ हजार हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे.दमदार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात १९, अकोला १५, अमरावती ३ व यवतमाळ जिल्ह्यात १ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात वनारशी येथील राहुल मकेश्वर (वय ३३) हा तरुण नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला, तर अकोला जिल्ह्यात मोरगाव भाकरे येथे घराची भिंत अंगावर पडल्याने मनोहर महादेव वानखडे (६०) या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात हिवरखेड येथे घराची भिंत अंगावर पडल्याने कमलाबाई गवई या महिलेचा मृत्यू झाला.अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यात ११,१६३ हेक्टरमधील कपाशी, सोयाबीन, तूर, केळी, उडीद, मूग व ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने अमरावती जिल्ह्यात १८, अकोला ८३, बुलढाणा जिल्ह्यात ९२ घरांची पडझड झाली आहे.