अमरावती/वर्धा : सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले आहे. शेतात पाणी साचले असून, पेरण्या दडपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले.
अमरावती, तिवसा, मोर्शी व धामणगाव तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पाऊस झाल्याने खरिपाला दिलासा मिळाला. आता थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्या गतिमान होणार आहेत. २३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला व काही गावात पावसाचे पाणी शिरले. तिवसा आठवडी बाजारात हर्रासाकरिता आलेले ४२ व्यापारी व विक्रेते पुराच्या पाण्यात अडकल्याने जिल्हा शोध व बचावकार्य करीत सुखरूप बाहेर काढले. जोरदार पावसात ५० पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली असून, तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
देवळी-नांदुरा मार्गावरील पूल खचला....
वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी व आर्वी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर देवळी-नांदुरा मार्गावरील पूल क्षतीग्रस्त झाला आहे. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा या गावातील सखल भागातील ११० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ५४ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, ९९६ हेक्टरवरील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.