अमरावती : दोन महिन्यांपासून सुरू असलेले पावसाचे सत्र अजूनही थांबलेले नाही. २४ तासांत दर्यापूर तालुक्यासह सहा मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. अजून चार दिवस ‘येलो अलर्ट’ आहे. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली व पिके पिवळी पडायला लागल्याने जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट आहे.
जिल्ह्यात २४ तासात सरासरी ३६.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ६५.१ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात पडला तर सर्वात कमी १५.८ मिमी पावसाची दर्यापूर तालुक्यात नोंद झालेली आहे. ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने दर्यापूर तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. यामध्ये दर्यापूर महसूल मंडळात १०२ मिमी, सामदा ९७.३ व रामतीर्थ ८९.८ तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिवणी मंडळात ८४.८, अचलपूर तालुक्यात रासेगाव मंडळात ७५.८ तसेच चांदूरबाजार तालुक्यात तळेगाव मंडळात ८३.५ मिमी पावसाने अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.
जिल्ह्यात १ जून ते २३ जून दरम्यान ६३४.८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. त्यातुलनेत आतापर्यंत ६१०.३ मिमी पावसाची नोंद झाली. ही ९६.१ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेला ४२६.७ मिमी म्हणजेच ६७.२ टक्के पाऊस झाला होता. यंदा ५२ तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त तर ३८ तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.
५२ मंडळात पावसाची सरासरी पारजिल्ह्यात ५२ महसूल मंडळात पावसाने सरासरी पार केलेली आहे. दोन महिन्यापासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिके पिवळी आहेत. पिकांवर कीड व रोगाचा अटॅक झालेला आहे. शिवाय पिकांची वाढही खुंटली आहे. प्रतिकूल परिस्थितीमूळे खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.