लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मागील दोन दिवसांपासून मृग नक्षत्र सुरुवातीपासून वादळी पाऊस आणि धारदार सरी सायंकाळी कोसळत असल्या तरी मृगाचा किडा बेपत्ता झाला आहे . मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी ३ वाजता धामणगाव तालुक्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात वादळी पावसामुळे बुधवारी जळका पटाचे येथील अनेक घरांचे नुकसान झाले. यात घरावरील टिनपत्रे उडून गेले, तर अनेक कुटुंबे बेघर झाली. याच वेळी आसेगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावरील कपड्याचे छतही फाटले गेले. दुसऱ्या दिवशी ही गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस आला. अंजनसिंगीसह धामणगाव तालुक्यातील सर्वदूर गावांत या पावसाने हजेरी लावली.धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजतापासून वादळी पावसाला सुरुवात झाली. चांदुर रेल्वे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचलपुरात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस कोसळला. यामुळे उष्म्याने अक्षरश: भाजून निघालेल्या जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. अमरावती शहरात रात्री ८ च्या सुमारास पाऊस कोसळला. त्यापूर्वी आकाश ढगांच्या दाटीने काळेकुट्ट झाले होते. तथापि, अपेक्षेएवढा पाऊस कोसळला नाही. मृगाच्या सरींमध्ये मनसोक्त भिजण्याचा अमरावतीकरांचा मनसुबा अद्याप फळाला आलेला नाही. त्याअनुषंगाने कृषि विभागानेही खबरदारीचा उपाय सुचविला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांच्या पेरणीबाबत घाई करु नये, यासाठी शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्यातही गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली. यावेळी रस्त्याच्या कडेला सखल भागात पावसाचे पाणी जमा झाले. पावसामुळे गारवा निर्माण झाला होता.
परतवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
परतवाडा : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरासह परिसरातील ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी सात वाजता माॅन्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. सरीवर सरी कोसळल्याने रस्त्याने पाणी वाहिले. देवमाळी व परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. अचलपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे धान्य शेडमध्ये ठेवले होते. परंतु काही बाहेर ठेवलेल्या धान्याच्या पोत्यांवर ताडपत्री झाकून ते सुरक्षित करण्यात आले. पावसाच्या सरी कोसळल्याने उकाडा मात्र वाढला होता.