अमरावती : विलंबानंतर दमदारपणे सक्रिय झालेला पाऊस खरिपाच्या पथ्यावर पडला आहे. पश्चिम विदर्भात सरासरी क्षेत्राच्या ९४.५ टक्के म्हणजेच २९.९२ लाख हेक्टरमध्ये आतापर्यंत पेरणी आटोपली आहे. दरम्यान, पावसाने आठ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. यापैकी किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे.
विभागात ५ जुलैपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्याप थांबलेली नाही. जुलैमध्ये तर अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १७० टक्के पावसाची नोंद झालेली आहे. यादरम्यान सातत्याने अतिवृष्टी व संततधार पावसाने किमान २० टक्के क्षेत्रातील पिके बाधित झालेली आहे. यापैकी नापेर क्षेत्रात आता रब्बी हंगामातच पेरणी होण्याची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भात यंदाच्या खरिपासाठी ३१.६७ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या होत्या. परंतु पावसाच्या पुनरागमनानंतर आता खरिपाच्या पेरण्या पूर्णत्वास गेलेल्या आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ६.४६ लाख हेक्टर (९५ टक्के), यवतमाळ ८.५७ लाख हेक्टर (९५ टक्के), अकोला ४.१५ लाख हेक्टर (९४ टक्के), वाशिम ३.८६ लाख हेक्टर (९६ टक्के) व बुलडाणा जिल्ह्यात ६.८९ लाख हेक्टर (९४ टक्के) क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.