शेंदूरजनाघाट : नजीकच्या राज्य परिवहन सीमा तपासणी नाक्यावर वाहन ओव्हरटेकिंगच्या प्रकारातून झालेला वाद विकोपाला गेला. याच वादातून दुधाची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाने दुचाकी चालकाच्या अंगावरुन टँकर नेऊन त्याला ठार केले. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजतादरम्यान घडली. मृत मोर्शी येथील रहिवासी आहे. पोलीस सूत्रांनुसार, अनिल सदाशिव बागडे (४० रा. ज्ञनदीप कॉलनी मोर्शी) असे मृताचे नाव आहे. मध्यप्रदेशातून मोर्शीकडे मृत अनिल सदाशिव बागडे आणि त्यांचा मित्र दिनेश बोरीकर हे दुचाकी क्र. एम.एच.२७-ए.एन ०६९५ ने येत होते. गोनापूरपासून दुधाचा टँकर क्र.एम.एच ४२-बी ९४२६ भरधाव येत होता. एकमेकांना ओव्हरटेक करीत पुढे जाण्याची दोघांमध्येही चढाओढ सुरू होती. अखेर रवाळा नजीकच्या राज्य परिवहन सीमा तपासणी नाक्यावर थांबून या दोन्ही चालकांमध्ये वाद झाला. या वादाने उग्ररुप धारण केले. त्यानंतर संतापाच्या भरात दुधाच्या टँकर चालकाने दुचाकी चालक अनिल बागडे यांच्या अंगावर सरळ टँकर चढविला. यामध्ये दुचाकीचालक जागीच ठार झाला. या घटनेची फिर्याद मृताचा मित्र दिनेश बोरीवार याने शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी टँकरचालक अनिल गोविंदराव गवई (४५ रा. अंजनगाव (बारी) विरुध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे तसेच टँकरही जप्त केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अशोक लांडे करीत आहेत.सीमा तपासणी नाका कितपत सुरक्षित? सीमा तपासणी नाक्यावरच वाहन चढवून ठार केल्याने येथील कर्मचारी अधिकारी काय करीत होते, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. सीमा तपासणी नाका तरी सुरक्षित आहे काय, घटनेच्यावेळी येथील कर्मचारी काय करीत होते, असा सवाल उपस्थित होत आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी अंगावर टँकर चढवून हत्या केल्याचा हा प्रकार आहे. प्रारंभी घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.
जड वाहनाने चिरडले
By admin | Published: April 24, 2015 12:16 AM