महसूल विभागाचे आदेश : १३ हजार हेक्टर क्षेत्राला होणार लाभतिवसा : पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अतिवृष्टी झाली. यामुळे बाधित पिकांना शासनाद्वारे मदत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. याबाबत ९ जानेवारीला महसूल विभागाचे आदेश धडकले आहे. राज्यात गतवर्षी जून ते आॅक्टोबर दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे पिके बाधित होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातदेखील पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा अधिक ८६७.८ मिली. व ११५.२ टक्के पाऊस पडला. यामुळे सोयाबीन, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या आपत्तीमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांना शासनाच्या निर्णयामुळे मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेला आहे. अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर या पीक विमा योजनेच्या निकषानुसार विमा यंत्रणेद्वारे मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढलेला आहे. अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत मंडळनिहाय भरपाईची जी मदत देय असेल त्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात ५२ दिवस विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाली, यामुळे सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर ६० दिवसांच्या कालावधीत असणारे मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले तसेच सततच्या पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे हजारो हेक्टरमधील तुरीच्या पिकावर ‘मर’ रोगाचे आक्रमण झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी आली. मात्र आता शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे बाधित पिकांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)१९ हजार ५९० शेतकऱ्यांचे १२६६९ हेक्टर क्षेत्र बाधितगतवर्षी जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत १९ हजार ५९० शेतकऱ्यांचे १२ हजार ६६९ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यावर नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन १५५१ हेक्टर, कापूस ६६५ हेक्टर, तूर १३४२ हेक्टर, मूग व उडीद ९०४७, फळपिके १४.९२ हेक्टर, ज्वारी ७.८५ हेक्टर व भाजीपाला पिकांचे ४०.४४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहेत.दोन हेक्टर मर्यादेत राहणार मदतप्रचलित नियमानुसार शेती व बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीसाठी ३३ टक्के व त्याहून अधिक नुकसान झालेल्या नुकसानीसाठी ही मदत मिळणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेत मिळणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्याबाबत शासनाला सादर अहवालानुसार ही मदत मिळणार आहे. पंचनाम्यासोबत छायाचित्र अनिवार्यअतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यासोबत जीपीएस छायाचित्र आवश्यक आहे. उभे पीक, त्याचे नुकसान या सर्व बाबींसोबत संबंधित शेतकरी शेतात उभे असल्याचे या चित्रात दिसावयास हवे. मदतीची शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रकम जमा करण्यात येईल व या मदतीमधून बँकेला कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.
अतिवृष्टीसाठी मिळणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2017 12:08 AM