नरेंद्र जावरे
अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळ परिसरातील मोथा येथे प्रायोगिक तत्त्वावर लावलेली काजूचे झाडे काजूंनी मस्त लगडली आहेत. केवळ तीन वर्षांत या झाडांना काजू लागल्याने लागल्याने शासनाने लक्ष दिले तर हा प्रयोग मेळघाटातील आदिवासींना रोजगार देणारा ठरणार आहे. स्ट्रॉबेरी, कॉफीनंतर आता हा परिसर काजूसाठी ओळखला जाणार आहे.
गोवा व कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. मेळघाटातसुद्धा आता हा प्रयोग यशस्वी झाला आहे. नितीन ऊर्फ जयवंत राऊत यांनी हा प्रयोग आपल्या हॉटेल परिसरातील उद्यानात यशस्वी केला. पुणे येथून त्यांनी तीन वर्षांपूर्वी काजूची १२ रोपे आणली होती. एक फूट उंचीची ही रोपे आता सहा फूट उंचीची झाडे झाली आहेत. केवळ तिसऱ्याच वर्षी ती काजूंनी लगडली आहेत. राऊत यांनी यापूर्वी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरी आणून स्ट्रॉबेरीचेही उत्पादन घेतले. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने परिसरातील आलाडो मोथा व इतर परिसरातील शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतात.
फेब्रुवारी महिन्यात काजूला आला बार
सातही काजूच्या झाडांना बार आला असून, एप्रिल महिन्यात त्याला फळे लागली आहेत. आता या झाडांना टपोरे काजू लागले आहेत.
...तर मेळघाटात आदिवासींना उत्पन्नाचे साधन मिळेल
आदिवासी शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीमुळे वर्षभर रोजगार हमी योजनेच्या कामावरच अवलंबून राहावे लागते. परिणामी ते मुंबई, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, राजस्थान या परराज्यात कामासाठी स्थलांतरित होतात. येथे काजू बागा यशस्वी ठरल्यास त्यांना चांगला रोजगार मिळणार आहे. शेतात काजूची रोपे लावल्यानंतर उन्हाळ्यातसुद्धा पाण्याचा व खताचा खर्च नसल्याने याबाबत कृषी व इतर विभागांशी बोलून काजूची मोठ्या प्रमाणात लागवड करणार असल्याचे मेळघाटचे आ. राजकुमार पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी ठरला. काजूची झाडे आणून लावली. ती सुद्धा जगली. यामुळे मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार व उत्पन्न मिळणार आहे. आ. राजकुमार पटेल यांनी याची दखल घेत प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
-नितीन राऊत, हॉटेल व्यावसायिक, मोथा (चिखलदरा)