अमरावती : कोविड प्रादुर्भावामुळे मागील १८ महिन्यांपासून जिल्ह्याची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. सध्या जिल्हा कोविडमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जनसामान्यांचे कंबरडेच मोडले. जिल्ह्यातील तब्बल ९४ हजार ४९० व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला असला तरी कोविडमुक्त झाल्यानंतर नागरिकांनी इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी कराव्या यासंदर्भात नागरिकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचे बघावयास मिळते. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून, तसे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
बॉक्स
शस्त्रक्रियेसाठी दीड महिना वाट पाहा
इतर आजारांची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोरोना झाल्यानंतर दीड महिन्याचा कालावधी होऊन गेलेला असावा. मात्र, आजार पाहून अत्यावश्यक शस्त्रक्रिया करता येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात असून, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची आरटीपीसीआर किंवा अँटिजन पद्धतीने कोविड चाचणी केली जाते. कोविड टेस्टनंतरच रुग्णाची शस्त्रक्रिया केली जात आहे.
बॉक्स
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
- सिझर प्रसूती दरम्यान तसेच अपघातानंतर अत्यावश्यक शस्त्रक्रिया दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसह शासकीय रुग्णालयात केल्या जात असल्या तरी या शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांकडून रुग्णाची कोविड चाचणी केली जात आहे. अहवाल आल्यावर शस्त्रक्रिया केली जाते.
बॉक्स
प्लान शस्त्रक्रिया
- प्लान शस्त्रक्रिया मोतीबिंदू, हर्निया, हायड्रोसील, आदी पूर्वनियोजित शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची कोविड टेस्ट केली जाते. कोविड टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच रुग्णाची शस्त्रक्रिया केली जात असून, अहवाल कोविड पॉझिटिव्ह आल्यास पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलली जाते.
कोट
आरटीपीसीआर आणि अँटिजन पद्धतीने कोविड टेस्ट केली जाते. नागरिकांनी कुठलीही भीती मनात न ठेवता डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करावी. अनेक रुग्ण कोरोनाच्या भीतीमुळे शस्त्रक्रिया करण्यास घाबरतात. अशावेळी त्यांना इतर आजारांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती.
बॉक्स
कोविड एकूण बाधित : ९६०९८
एकूण कोविडमुक्त : ९४४९०
एकूण ॲक्टिव्ह रुग्ण : १३
एकूण कोविड मृत्यू : १५६३