नागरिक भयभीत : चार श्वान केले फस्त लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निंभोरा परिसरात बिबट्याने हैदोस घातला असून रविवारी रात्री १०.३० वाजता त्याने येथे एक झोपडीवर हल्ला केल्यामुळे या झोपडीतील एक कर्मचारी भयभीत झाला होता. रात्री दीड वाजेपर्यंत वनविभागाच्या अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते व त्यांनी परिसरातील पाहणी केली. आठवडाभरापासून चारवेळा तो बिबट एकाच ठिकाणी येत असल्याची माहिती आहे. या बिबटाने चार श्वान आतापर्यंत फस्त केल्याची माहिती येथील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली.मुधोळकर पेठ येथे राहणारे अनंत टाले यांचे जुना बायपास एमआयडीसी ते निंभोरा परिसरातील एका ठिकाणी बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर चौकीदार म्हणून योगेश काळमेघ यांची नेमणूक केली आहे. तो एका झोपडीत राहत असून परिसरात या आठवड्यात त्यांना चारवेळा तो बिबट आढळून आला. पाणी व अन्नाच्या शोधात हा बिबट या ठिकाणी आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास बिबट आला होता. रविवारी तर बिबट्याने हद्दच पार केली. त्याने काळमेघ ज्या ठिकाणी झोपडीत झोपलेले होते त्या दाराला पंजे मारले. त्यामुळे चौकीदार घाबरले. त्यांनी आतच ओरडाओरड केली. यानंतर तोे बिबट या ठिकाणावरून नेघून गेला. काळमेघ यांनी ही माहिती मालक अनंत टाले यांना दिली. त्यांनी मृधोळकर पेठ परिसरातील जय टाले, चंदू भालेराव, भुपेश ठाकरे, विवेक देशपांडे यांना सोबत घेतले घटनास्थळ गाठले. या संदर्भातील माहिती भ्रमण्धवनीवरून टाले यांनी वडाळी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पण वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी उशिरा पोहोचल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत या परिसराची पाहणी केली. या ठिकाणी बाजुलाच जंगल आहे. पण एमआयडीसीचा परिसर असल्यामुळे येथे अनेक कारखाने व उद्योग उभारण्यासाठी बांधकाम सुरू आहे. तसेच निंभोरा परिसरात आठ ते दहा नागरिकसुध्दा वास्तव्याला आले आहेत. अशाच बिबट्याचा सतत वावर या परिसरात होत असल्याने येथील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्या बिबट्याला जरबंद करून जंगलात सोडावे, अशी मागणी होत आहे. परिसरात आढळले पायाचे ठसे मागील आठवडाभरापासून सदर बिबटाचा निंभोरा परिसरात वावर आहे. या ठिकाणी शुक्रवारी आल्यानंतर त्याच्या पायाचे ठसे परिसरात नागरिकांना आढळून आले. ते वनविभागाच्या अधिकाऱ्यांनासुध्दा दाखविण्यात आले. वनविभागाचे वनपरिक्षत्र अधिकारी एम.व्ही धंदर, एस.के.वाजगे, वनरक्षक अमोल बावणेर, वीरेंद्र उजैनकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचे पगमार्क (पायाचे दोन ठिकाणचे ठसे) घेतले आहे. सोमवारी जंगलात अधिकाऱ्यांची गस्त येथील राष्ट्रीय महामार्गला लागून असलेल्या जंगलात सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांनी गस्त केली आहे. एकूण नऊ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टीमने ही पाहणी केली. परंतु त्यांना या ठिकाणी बिबट आढळून आले नाही. परंतु याठिकाणी बिबटाचा वावर असल्याच्या बाबीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. बिबट याठिकाणी नक्कीच येत आहे. दोन ठिकाणचे बिबटाचे पगमार्क घेण्यात आले आहेत. रात्री घटनास्थळी पाहणी केली. सोमवारी जंगलात गस्त केली पण बिबट आढळून आले नाही. - एस. के वाजगेवनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी
निंभोरा परिसरात बिबट्याचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 12:05 AM