गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यमान दशकात ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यात किंबहुना अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय आखाड्यात उच्चशिक्षितांचा टक्का २९ वरच आहे. ३४ टक्के उमेदवार दहावीच्या आतील आहे. त्यामुळे राजकारणात, निवडणुकीत शिक्षणाला दुय्यम स्थान आहे काय, यामध्ये कोणत्या मेरिटवर मतदान होते आदी विषय प्रकर्षाने समोर आले आहेत.राजकारणात उच्चशिक्षितांनी समोर यावे व शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा, अशी हाक राजकीय पक्षांकडून नेहमीच दिली जाते. मात्र, त्याच राजकीय पक्षांकडून उच्चशिक्षितांना राजकारणाच्या आखाड्यात उमेदवारी दिली जाते काय, हा प्रश्नदेखील यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आला आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून पुरेशा प्रमाणात उच्चशिक्षितांना उमेदवारी तर नाहीच; मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी या निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल करणाऱ्या अपक्षांमध्येदेखील उच्चशिक्षितांचे प्रमाण नगण्य आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी २४ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये पाच उमेदवार पदवीधर, दोन पदव्युत्तर व अन्य उमेदवार पाचवी ते अंडरगॅ्रज्युएट आहेत. विशेष म्हणजे, आयोगाकडे दाखल शपथपत्रात बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही एका ओळीत किंवा एका शब्दात संपली. त्यामुळे शिक्षणाच्या पंढरीत राजकीय आखाड्यात शिक्षण हा मुद्दा दुर्लक्षित असल्याचे वास्तव आहे. उमेदवारांची कागदपत्रे व शपथपत्र निवडणूक कार्यालयाच्या प्रसिद्धी फलकावर व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आले.उच्चशिक्षितांचा पुढाकारच नाहीअमरावतीत २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसुळ यांची बी.कॉम., महाआघाडी समर्थित नवनीत राणा दहावी, बसपाचे अरुण वानखडे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका व पत्रकारिता पदविका तसेच वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांची कृषी पदविका अशी शैक्षणिक पात्रता आहे. नीलिमा भटकर (बीई संगणक), प्रमोद मेश्राम (एमए बीपीएड), राजू जामनेकर (एमए समाजशास्त्र), श्रीकांत रायबोले (बीए बीपीएड), पंचशीला मोहोड (बी.एस्सी.), पंकज मेश्राम (बीए), विजय विल्हेकर (प्री बायोलॉजी), संजय आठवले बीए (अंत्य), राजू सोनोने (बीए अंत्य), प्रवीण सरोदे बीकॉम (द्वितीय), नीलेश पाटील (बारावी), अनिल जामनेकर (बारावी), नरेंद्र कठाणे (बारावी), विलास थोरात (बारावी), ज्ञानेश्वर मानकर (दहावी), मीनाक्षी कुरवाडे (दहावी), राहुल मोहोड (दहावी), अंबादास वानखडे (आठवी), राजू मानकर (पाचवी) अशी उमेदवारांची अर्हता आहे.मतदार देतात का राजकीय नेत्यांच्या शिक्षणावर भर?नेत्यांच्या कर्तृत्वाने होतो विकास सिद्धउच्चशिक्षित असल्यासच तो विकास करू शकतो, ही बाब भारतीय राजकारणात गौण आहे. अनेक अंडरग्रॅज्युएट नेत्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले आहे, असे प्रदीप गौरखडे यांनी सांगितले.शिक्षणाचा टक्का कमी ही चिंतेची बाबराजकारणात शिक्षितांचा टक्का कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे. लोकशाही सुदृढ करण्यास उच्चशिक्षितांनी हिरीरीने समोर यायला पाहिजे, तरच लोकशाही टिकेल, असे रवींद्र देशमुख म्हणाले.मतदारांनी शिकवावा मतदानाद्वारे धडामुळात राजकीय पक्षांना शिक्षणामध्ये रस नाही. अलीकडे जात,धर्म, समाज हा मुद्दा वरचढ ठरत आहे. मतदारांनीच यासाठी धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया दीपक गोफने यांनी दिली.
उच्चशिक्षितांचा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 1:18 AM
विद्यमान दशकात ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यात किंबहुना अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय आखाड्यात उच्चशिक्षितांचा टक्का २९ वरच आहे. ३४ टक्के उमेदवार दहावीच्या आतील आहे.
ठळक मुद्देराजकीय आखाड्यात शिक्षण : कोणत्या मेरिटवर होते मतदान? ७१ टक्के अंडरग्रॅज्युएट