अमरावती : महानगरपालिकेच्या कर विभागाने एका दिवसात उच्चांकी ४८ लाखांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. ३१ मार्च हा अंतिम दिनांक आहे. आतापर्यंत २९ कोटी ३८ लाख २७ हजार ९८५ रुपये एवढी वसुली झाली आहे. यावर्षी ४७ कोटी ८१ लाख ६६ हजारांचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्यांक आहे.
नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येतात. नागरिकांकडून कररूपाने गोळा होणाऱ्या महसुलाची यात महत्त्वाची भूमिका असते. वेळेत मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांवर दरमहा आवर्ती दराने शिल्लक रकमेवर दोन टक्के दंडाची आकारणीदेखील केली जाते. त्यानंतरही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांवर संबंधित दंडात्मक कारवाई केली जाते. त्यापुढील टप्प्यात चल संपत्ती जप्त करण्याची, अटकावणीची कारवाईदेखील करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. जे मालमत्ताधारक ९० दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पानिहाय कारवाई सुरू करण्यात येते. त्याचबरोबर मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर आवर्ती पद्धतीने दरमहा दोन टक्के या दराने दंड आकारणी करण्यासदेखील सुरुवात केली जात असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
बॉक्स
अशी आहे कारवाईची प्रक्रिया
प्रथम प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा, नंतर देयक अदा न केल्यास 'डिमांड लेटर' पाठविले जाते. यानंतरच्या २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ताधारकास दिली जाते. नंतर मालमत्तेचा काही भाग 'सील' (मोहोरबंद) करण्याची कारवाई व मालमत्ता व्यावसायिक स्वरूपाची असल्यास दंडात्मक कारवाई आणि शेवटच्या टप्प्यात मालमत्ता अटकावाची कारवाई करण्यात येते.
बॉक्स
मालमत्ता कर भरण्यासाठी सुविधा
सर्व झोन कार्यालयात मालमत्ता करांचा भरणा रोख रकमेच्या स्वरूपात करता येतो. झोन कार्यालयात मालमत्ता कर रकमेचा ‘धनादेश’ किंवा ‘धनाकर्ष’ (डिमांड ड्राफ्ट) जमा करूनदेखील मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मालमत्ता कर देयकावर महानगरपालिकेचे बँक खाते क्रमांक नमूद केलेले असतात. या बँक खाते क्रमांकावर ‘एनईएफटी’ किंवा ‘आरटीजीएस’द्वारेदेखील ऑनलाईन पद्धतीने करांचा भरणा करता येतो.