अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्याच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मेपासून कार्यान्वित होत आहे. दुपारी २ ते १० या वेळेत येथे बाह्यरुग्ण सेवा असणार आहे. त्याशिवाय येथे येणाऱ्यांची तपासणी मोफत केली जाणार असून मोफत औषधही मिळणार आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचनांनुसार सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची स्थापना करण्यात येणार आहे. अमरावती शहरातील चपराशीपुरा तसेच भातकुली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, धारणी, चिखलदरा आदी ठिकाणी हे दवाखाने सोमवारपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी दिली. झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आपला दवाखानाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दवाखान्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत.
या आरोग्य सेवा दिल्या जाणार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये नागरिकांना विविध आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत. यामध्ये बाह्यरुग्ण सेवेची वेळ दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यत मोफत औषध उपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी व लसीकरण तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्ययंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आवश्यकतेनुसार व विशेष तज्ज्ञ संदर्भ सेवा आदी सेवा देण्यात येणार आहेत.