धामणगाव रेल्वे : हिंगणगाव ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. हिंगनगाव, परसोडी या जुळ्या तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्रामस्थांना मूलभूत व प्राथमिक सेवा सुविधा पुरविण्याचे काम या ग्रामपंचायतीकडून होत आहे.
दिल्ली स्थित संस्थेने मानांकनापूर्वी ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, ग्रामपंचायतीचे नियमित दप्तर व आर्थिक तपासणी (ऑडिट), ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाडी, शैक्षणिक सेवा सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य आदींची पाहणी करून गुणांकन ठरविले. ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीणदृष्ट्या विकास साधला आहे. गावाचा विकास साधत असताना ग्रामपंचायतीने सामाजिक बांधीलकी जपत केलेले कार्य व राबविलेले लोकोपयोगी उपक्रम, शासकीय कामातील सहभाग वाखाणण्याजोगा राहिला आहे. येथील नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने शासकीय योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली. त्यामुळे
आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र लेखापरीक्षक विनोद कोल्हे यांनी दिले. येथील सरपंच दुर्गाबक्षसिंह ठाकूर,उपसरपंच संगीता धोटे, सचिव सचिन तसर व ग्रामपंचायत सदस्यांचे त्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
------------------
हिंगणगाव ग्रामपंचायतीचे अनुकरण तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनी करून आपले गाव व ग्रामपंचायतीला असा दर्जा मिळावा, यासाठी पुढाकार घ्यावा. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
- माया वानखडे, गटविकास अधिकारी