धनज (बु) येथील घटना : एसटीच्या अपघातात तुटला होता पाय अमरावती : शाळेसमोर गोळ्या बिस्कीट विकणाऱ्या मुकेश सिध्दार्थ गवई (३२) याला पाच वर्षांपूर्वी एसटीची धडक बसल्याने त्याचा उजवा पाय निकामी झाला होता. तेव्हापासून मुकेश अपंगत्वाचे जीवन जगत आहे. आर्थिक संकटांनी वेढलेल्या मुकेशने अखेर शनिवारी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धनज (बु) येथील रहिवासी मुकेश गवई हा शेतमजुरीचे कामे करून आई-वडील, पत्नी व मुलासोबत आंनदाने राहत होता. मात्र, पाच वर्षांपूर्वी एसटीच्या धडकेमुळे त्याचा उजवा पाय निकामी झाला आहे. तेव्हापासून मुकेश हा अपंगत्वाचे जीवन जगत होता. पाय निकामी झाल्याने मुकेश शेतमजुरी करू शकत नव्हता, त्यामुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न मुकेशसमोर निर्माण झाल्याने तो आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे. मात्र, हिम्मत न हारता मुकेशने गावातील शाळेसमोर गोळ्याबिस्कीट विकणे सुरु केले होते. मात्र, त्या पैशांमध्ये मुकेशला घर चालविणे कठीण झाले. त्यामुळे पत्नीने साथ देऊन शेतमजुरी सुरु केली होती. मात्र, मुकेशचा पाय नेहमीच दुखत असल्यामुळे त्याला जीवन असह्य वाटू लागले. त्याने कृत्रिम पाय बसविल्याने काही हळूहळू चालू शकत होता. मात्र, पायाचे दुखणे वाढत असल्यामुळे त्याने विविध ठिकाणी उपचार केलेत, उपचार करून त्याच्याजवळील पैसेसुद्धा संपले होते. एसटीखाली आल्याने त्याला अपंगत्वाचे जीवन जगावे लागले. त्यामुळे महामंडळाकडून आर्थिक मदतीची आस त्याला होती. मात्र, महामंडळाच्या दारी अनेक चक्करा मारल्यावरही त्याला कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. असे मुकेशची पत्नी संगीता हिने 'लोकमत'शी बोलताना सांगितले. मुकेशने अनेकदा एसटी महामंडळाचे उंबरठे झिजविले. मात्र, त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुकेशचे पायाचे दुखणे व आर्थिक संकटामुळे अखेर त्याने शनिवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांला गंभीर अवस्थेत कुटुंबीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सद्यस्थितीत मुकेशची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (प्रतिनिधी)
'त्याचे' आर्थिक विवंचनेमुळे विषप्राशन
By admin | Published: August 24, 2015 12:33 AM