नरेंद्र जावरे
अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील ऐतिहासिक गाविलगड किल्ला गुरुवारी दुपारी १२ पासून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून राख झाली. किल्ला बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आगडोंब पाहूनच परतावे लागले. वृत्त लिहिस्तोवर धुमसत असलेली आग विझविण्याचे कार्य व्याघ्र प्रकल्पाचे अंगारी कर्मचारी, वनरक्षक करीत होते.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागांतर्गत असलेल्या गाविलगड परिक्षेत्रातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याचा परिसर आहे. गुरुवारी दुपारपासून गाविलगड किल्ल्याच्या खोऱ्यात धुमसत असलेली आग किल्ल्यात येऊन पोहोचली. त्यानंतर किल्ल्यातील गवत आणि वृक्षांना आगीने कवेत घेतले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत किल्ल्यातील विविध भागात ही आग पोहोचली होती. आग विझवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळकेसह वनपाल, वनरक्षक, अंगारी, वनमजूर ब्लोअर मशीन घेऊन काम करीत होते. परंतु, किल्ल्याचा मोठा परिसर पाहता सर्वच राखरांगोळी झाल्याचे चित्र होते. हवेच्या जोमाने आग पसरत होती. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मेळघाट आणि वनविभागाच्या जंगलात दररोज मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळला आहे. त्याचा फटका वनसंपदेला व पर्यावरणाला बसत असून वन्यप्राणी सैरावैरा पळत आहेत. सरपटणारे प्राण्यांचा आगीने होरपळून कोळसा होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
पर्यटकांनी दुरूनच बघितला आगडोंब
बहमनी ते इंग्रज राजवट अशी अनेक स्थित्यंतर या किल्ल्याने बघितली आहेत. किल्ला पाहण्यासाठी गुरुवारी आलेल्या पर्यटकांना दुरूनच आगडोंब पाहून आल्यापावली परत जावे लागले.
चराईबंदीमुळे आगी लावल्या?
गाविलगड परिक्षेत्रातील जंगलात व्याघ्र प्रकल्पाने मागील दोन वर्षांपासून चराई बंदी, कुऱ्हाड बंदी केल्याने ही आग लावण्यात आली असल्याची शंका वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
गाविलगड किल्ल्यासह परिसराला आग लागली आहे. ती आटोक्यात आणण्याचे कार्य ब्लोअर मशीन, अंगारी, वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सुरू आहे. चराई बंदी असल्याने आग लावण्यात आल्याचा अंदाज आहे.
दिनेश वाळके, वनपरिक्षेत्र अधिकारी, गाविलगड परिक्षेत्र, चिखलदरा