गणेश वासनिकअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून आता पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे छायाचित्र आणि आईचे नाव अंकित असलेली अत्यंत सुरक्षित अशी पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
काळानुरूप पदवी प्रमाणपत्राचे स्वरूप बदलविण्याचा निर्णय कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेने घेतला. ए-फोर एवढ्या आकाराच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांच्या आईचे नाव, स्वत:चे छायाचित्र हे डेटाबेस असेल. प्लास्टिक आवरण, आर्कषक डिझाइन, कागदाचा दर्जा अत्यंत सुरेख असावा, असे व्यवस्थापन परिषदेने ठरविले आहे. येत्या दीक्षांत समारंभात नव्या आकारातील पदवी प्रमाणपत्र देण्याची तयारी परीक्षा व मूल्यांकन विभागाने चालविली आहे.
मूळ पदवी प्रमाणपत्राची झेरॉक्स काढल्यास त्या प्रतिवर झेरॉक्स असे लिहून येईल, अशी सुरक्षितता ठेवण्याची खबरदारी घेतली जाणार आहे. पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठाचा लोगो हा गोल्ड फाइट स्टॅम्प असणार आहे. हा लोगो सहजासहजी नव्हे, तर केवळ प्रकाश व्यवस्थेतून बघितल्यासच पदवी प्रमाणपत्रावर दिसून येईल. पुणे, सोलापूर विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असलेल्या चांगल्या बाबी अंतर्भूत करून नावीन्यपूर्ण पदवी प्रमाणपत्र तयार करण्याची जबाबदारी परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयत वडते यांच्याकडे पदवी सोपविली जाणार आहे.
पदवी प्रमाणपत्रात तिस-यांदा बदलसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १ मे १९८३ रोजी झाली. सुरुवातीला पदवी प्रमाणपत्र हे हस्तलिखित स्वरूपात दिले जायचे. १९९७ साली संगणकीकरण झाले तेव्हा यामध्ये बदल झाला. येत्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्राचे स्वरूप पूर्णत: बदलले असेल.
यापूर्वीचे पदवी प्रमाणपत्र मोठ्या आकाराचे होते. यापुढे दिली जाणारी पदवी ही अत्यंत आकर्षक, देखणी, सुरक्षित असून, विद्यार्थ्यांचे छायाचित्र व आईचे नाव अंकित राहील.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.