मोहन राऊत/नीलेश रामगावकर
अमरावती : कृष्णा-विक्रांत, बादल-बच्चू, लकी-शिवा राम-श्याम. शिवा-खंड्या यांच्या स्पर्धेत उन्नती लोया हिच्या संग्राम-देवगिरी या बैलजोडीने १३.७२ सेकंदाचा वेळ नोंदवित इतिहास रचला. या जोडीने पहिला क्रमांक घेतला. आशा इंगोले यांच्या लकी-शिवाने एक सेकंदाच्या फरकाने १३.७३ सेकंद वेळ नोंदवित दुसरा क्रमांक पटकावला. आचल नागरीकर यांच्या १४.१२ सेकंद धाव घेत बादल-बच्चू याने तिसरा क्रमांक पटकाविला.
राज्यात शेतकऱ्यांचा जिवाभावाचा ऐतिहासिक शंकरपट असलेल्या तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाच्या वतीने दो-दाणी, एक-दाणी शर्यत घेतली गेली. पटाच्या शेवटच्या दिवशी महिलांकडे शंकरपटाची जबाबदारी असते. आज पुरुषांप्रमाणे महिला शंकरपटाची सूत्रे नोंदणी करणे, जोड्या जुंपणे, घडाळ्यांची नोंद करणे, जोड्या हाकणे, बक्षीस वितरण करणे ही जबाबदारी महिलांनी सक्षमपणे सांभाळली. देशातील हा अभिनव उपक्रम केवळ तळेगावातच राबविला जात असल्याने प्रसारमाध्यमाने बुधवारी एकच गर्दी केली होती.
संग्राम-देवगिरीने डोळ्याच्या पापण्या हलण्याअगोदरच घेतली धाव
महिला धूरकरी असलेल्या शंकरपटाला बुधवारी सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. यात उन्नती लोया हिच्या संग्राम-देवगिरी या बैलजोडीने डोळ्याच्या पापण्या लवण्याअगोदरच थेट धाव घेत १३.७२ सेकंदात अंतर कापून पहिला क्रमांक घेतला. आशा इंगोले यांच्या लकी-शिवा व आचल नागरीकर यांच्या बादल-बच्चू यांच्यासह काजल मारबदे, अश्विनी बेले, आशा ठाकरे, उज्ज्वला फरदे या धुरकऱ्यांच्या बैलजोड्यांनीही पारितोषिके पटकावली.
आमचा राम राम घ्यावा
कृषक सुधार मंडळाच्या शंकरपटाला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर यंदा भरलेल्या या शंकरपटात मराठवाडा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भातील तब्बल तीनशे जोड्यांनी सहभाग घेतला होता. यंदा पहिल्यांदाच कृषक सुधार मंडळाचे माजी अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांच्यानंतर युवा पिढीच्या हाती सूत्रे देण्यात आली. प्रत्येक शंकरपटात सहभागी झालेल्या बैलजोडीचे मालक व धूरकरी यांना शेला-नारळ व विजेत्यांना कृषक सुधार मंडळाचे नवी पिढीतील अध्यक्ष शिवाजी देशमुख, उपाध्यक्ष भूपेंद्र निंबाळकर, सचिव आनंद देशमुख यांनी बक्षीस दिले. नामवंत जोड्या व त्यांच्या धूरकऱ्यांनी यानंतर राम राम घेत या शंकरपटाचा निरोप घेतला.