वैभवशाली दुर्मीळ गणेश मूर्ती अचलपुरात
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर शहरातील बाविशी आणि बावन एक्का या स्वातंत्र्यपूर्व काळातील नाट्यमंदिरातील गणेशमूर्तींना सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. यात वैभवशाली श्रीमंतीच्या थाटातील एकमेव दुर्मीळ अशी पांढऱ्या मार्बलवरील गणेशमूर्ती अचलपुरातील बावन एक्का नाट्यमंदिरात आजही विराजमान आहे.
बाविशी आणि बावन एक्का ही दोन्ही इंग्रजकालीन नाट्यमंदिरे अचलपूर शहरात आहेत. यातील बावन एक्का नाट्यमंदिर इतिहासजमा झाले आहे. अण्णासाहेब देशपांडे यांच्या मालकीचे हे नाट्यगृह. या नाट्यगृहात खुद्द अण्णासाहेब देशपांडे यांनी त्या काळात प्राणप्रतिष्ठा केलेली दुर्मीळ गणेशमूर्ती मात्र कायम आहे. पांढऱ्या मार्बलवरील, उजव्या सोंडेची, नितांत सुंदर, सुबक, कोरीव-कातीव, आकर्षक अशी ही दुर्मीळ गणेशमूर्ती शहराचे वैभव ठरली आहे.
बाविशी आणि बावन एक्का नाट्यमंदिरातील गणेशमूर्ती १८९४ दरम्यानच्या आहेत. बाविशीमधील गणेशमूर्तीही उजव्या सोंडेची आणि पांढऱ्या मार्बलवरील आहे. ही गणेशमूर्ती १८९४ मध्ये मध्य प्रदेशातील जबलपूर येथून डोक्यावर आणली गेली. जबलपूरहून अचलपूरला पोहोचायला या मूर्तीला तब्बल ४० दिवस लागले. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दक्षिण भारतीय शास्त्रोक्त पद्धतीने केली गेली. वैदिक पद्धतीतील प्रमाणबद्धतेनुसार ही मूर्ती परिपूर्ण आहे. या गणेशमूर्तीच्या मुकुटापासून तर हातातील शस्त्र व जानव्यापर्यंत सर्वच मूर्तीच्या अंगावर कोरले गेले आहेत.
बाविशीतील या गणेशमूर्तीपेक्षा बावन एक्कामधील गणेशमूर्ती वेगळी आणि दुर्मीळ ठरली आहे. दादासाहेब पांगारकर, अण्णासाहेब देशपांडे, आप्पासाहेब देशमुखांनी त्याकाळी या नाट्यमंदिरांची आणि नाट्यमंदिरातील गणपती मंदिराची उभारणी केली आहे. प्रभात, गंधर्व, किर्लोस्कर, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह ग्रज अधिकाऱ्यांनीही या नाट्यमंदिरातील गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्याचा इतिहास आहे.
गणेशोत्सव आणि गणेश जयंतीसह चतुर्थीला या ठिकाणी दर्शनार्थींची वर्दळ राहते. बाविशीमधील गणपती मंदिरात वर्षभर मानाच्या पंगती उठतात. श्रद्धेला प्रतिसाद देणारे गणपती म्हणूनही भक्तांमध्ये मान्यता आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही पर्यटकांमध्ये या मूर्तींचे वेगळेच आकर्षण आहे.
डेपोचा गणपती--
परतवाडा शहरातील डेपोचा गणपती स्वयंभू आहे. काळ्या दगडावर कोरलेली एक लहान गणेशमूर्ती या ठिकाणी आहे. शेकडो वर्षांपूर्वी खेतुलालजी अग्रवाल यांच्या शेतातील वड, पिंपळाच्या झाडालगत उत्खननात ही गणेशमूर्ती आढळून आली. त्यांनी त्याच ठिकाणी या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. शेंदूरवर्णी पुरातन ही गणेशमूर्ती आजही त्याच ठिकाणी आहे.