लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संचारबंदी आदेशामुळे वाहतुुकीच्या साधनांअभावी रविवारी ८० वर्षीय वृद्धेने देडतलाई ते धारणी हा ३० किमीचा प्रवास पायी केला. अगदी गलितगात्र स्थितीत ती धारणीत पोहोचली. तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या आजीला स्थानिकांनी मदतीचा हात देऊन तिचा पुढील प्रवास सुकर केला.
तालुक्यातील दिया येथील बुराई चतुरकर ही वृद्धा तिच्या मुलीच्या गावी मध्य प्रदेशातील शेखपुरा येथे गेली होती. तेथून ती रविवारी दिया गावी येण्याकरिता निघाली. तिला मध्य प्रदेशातील देडतलाईपर्यंत वाहन मिळाले. तेथून ती दियाकरिता निघाली असता, अमरावती जिल्ह्यात रविवारीय लॉकडाऊन असल्याने वाहने बंद होती. त्यामुळे ती तेथून चक्क ३० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत रविवारी दुपारी धारणीत पोहचली. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी तिला स्वत:च्या वाहनाने दिया येथे पोहचवून दिले.
मध्य प्रदेशातील शेखपुरा येथे गेलेली बुराई ही वृद्धा गावाकडे रेशन व निराधार योजनेची रक्कम घेण्याकरिता दिया या मूळ गावी निघाली होती. तिला शेखपुऱ्याहून तिच्या नातेवाइकांनी बसमध्ये बसवून दिले. ती बस रविवारी अमरावती जिल्हा सीमेवर मध्यप्रदेशातील देडतलाई गावापर्यंतच आली. त्यापुढील ३० किलोमीटरचा प्रवास पायी करीत ती धारणीला आली. येथील महामार्गावरून एकटीच पायी जाणारी वृद्धा पाहून माजी नगरसेविका रेखा पटेल यांनी तिची विचारपूस केली. तिने आपबिती कथन केली. निवासाकरिता मंदिर आसपास आहे का, असे ती त्यांना विचारत होती. त्यांनी त्या आजीला पोटभर जेवण व पाणी दिले आणि शेजारी परिचित असलेल्या मनीष मोहोड या मुलाला तिला दिया गावी पोहचविण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले. त्याने लगेच धारणीचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांना घटनेची माहिती दिली. कुळकर्णी हे सामाजिक कार्यकर्ते योगेश मावस्कर यांच्यासह बुराई आजीजवळ पोहचले. त्यांनी तिला स्वत:च्या वाहनामध्ये बसवून घेतले व तिच्या गावी दिया येथे माजी सरपंच किशन पटेल यांच्या घरी पोहचवून दिले.