मेळघाटात बाजार भरले, पण सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र धडकले
परतवाडा /चिखलदरा : मेळघाटच्या धारणी, चिखलदरा तालुक्यासह मोठी बाजारपेठ असलेल्या परतवाडा शहरात पोळा सणानिमित्त आवश्यक साहित्याची मोठ्या प्रमाणात दुकाने लागली. आदिवासी शेतकऱ्यांनी गतवर्षीपेक्षा यंदा जोमाने खरेदीही केली. परंतु, पोळा सण घरीच साजरा करण्याबाबत आदेश धारणीचे एसडीओ तथा सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रावरून तहसीलदार, पोलीस विभाग आदींना जारी केले आहेत.
अनलॉक होऊन नंतर सर्वत्र आठवडी बाजार करण्याला परवानगी देण्यात आली. त्यानुसार सण, उत्सवांच्या अनुषंगाने बाजारात विविध आवश्यक असणाऱ्या वस्तूंची रेलचेल सुरू झाली. खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. पोळा सणासाठी सर्वत्र आठवडी बाजारामध्ये सर्जा-राजाच्या साजशृंगाराच्या सामानाची खरेदी शेतकऱ्यांनी केली. परंतु, आता प्रशासनाचे आदेश पोळा सन न भरण्याबाबत धडकल्याने बैलांची पूजा व सजावट करून घरीच त्यांना निरखण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.