अमरावती : महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच इच्छुक उमेदवारांद्वारे नागरिकांना दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा जोर पकडला आहे. या चमकोगिरीसाठी चौकाचौकात फलक लावणे, हे एक प्रभावी माध्यम असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. बाजार व परवाना विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे फुकट्या चमकोगिरीला उधाण आले आहे.
महापालिकेत सध्या निवडणुकांचे पडधम वाजायला लागले असल्याने प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार नागरिकांना शुभेच्छा देण्याासाठी सरसावले आहेत. पहिले नवरात्रीनंतर दसरा व आता दिवाळीच्या शुभेच्छा फलकांनी शहरातील चौकांचा श्वास गुदमरायला लागलेला आहे. या भागाच्या विकासासाठी आपणच योग्य उमेदवार राहणार असल्याचे ठासून सांगितल्या जात आहे. यामध्ये महिला इच्छुकांची भाऊगर्दीदेखील पाहायला मिळत आहे. एका नेत्याच्या वाढदिवसाला अलीकडे प्रत्येक प्रभागात मोठमोठी हो लागलेत. त्यामूळे महापालिका निवडणुका सोडाच नेत्यांना आता विधानसभेचेही वेध लागल्याचे चित्र या काळात दिसून येत आहे.
या चमकोगिरीसाठी नियम कायदे पायदळी तुटवले जात आहेत. कुठेही परवानगी काढल्या जात नाही, सर्व बॅनर, पोस्टर, होल्डिंग एकप्रकारे अनधिकृत ठरत आहे. मधल्या कोरोना काळात चौकांनी मोकळा श्वास घेतला घेतला होता. महापालिका निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर आता पुन्हा चमकोगिरीला ऊत आलेला आहे. त्यामुळे महापालिकेचा बाजार, परवाना विभाग सध्या करतो तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
महापौरांचे आदेशाचा प्रशासनाला विसर
चार महिन्यांपूर्व झालेल्या आमसभेत महापौर चेतन गावंडे यांनी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राजकमल चौकात २०० मीटर अंतरपर्यंत फलकयुक्तीचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, या आदेशाचा विसर अंमलबजावणी यंत्रणेला पडला आहे. त्यामुळे राजकमल चौक आता चारही बाजूने अनधिकृत फलकांनी वेढला असल्याचे दिसून येते.
होर्डिंग पडल्यास अपघाताची भीती
शहरात अनधिकृतपणे मनमानेल तसे लावलेले फलक रस्त्यावर पडल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय यावरील मजकुराची देखील तपासणी झालेली नसल्याने अनधिकृत प्रकार घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न समोर आलेला आहे.