लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात केवळ मेळघाटात आढळणाऱ्या कोरकू या आदिवासी जमातीचा होळी हा दिवाळीपेक्षाही मोठा सण आनंदात साजरा केला जातो. ही होळी सुमारे पाच दिवस चालते. होळी हा सण साजरा करीत असताना जी गाणी म्हटली जातात, त्यात त्यांचा इतिहास सांगितला जातो. अनेकदा ही गाणी अर्थपूर्ण विनोदाने भरली असतात. विविध गावांतील नृत्य पथके होळी पेटवण्याच्या दिवशी गात असतात. होळीचा जो उंच दांडा व बांबू असतो, तो खाली पडायला आल्यास पोलीस पाटील त्याला दुसऱ्या लाकडाच्या साहाय्याने वरचेवर झेलतो. कारण तो बांबू व दांडा खाली पडल्यास आदिवासी समाजात अपशकुन मानला जातो. पोलीस पाटील झेललेल्या बांबूचा व दांड्याचा अग्रभाग तोडतो. त्या अग्रभागाची पूजा केली जाते. अग्रभागाचा तुकडा याच स्थानिक भागातील नृत्य पथकास दिला जातो. स्त्री-पुरुष, मुले आनंदाने होळीभोवती नाचतात व रात्र जागून काढतात. कोरकू होळीमध्ये गावपाटलाच्या भेटीवरून परत आल्यानंतर भोजन करून रात्रभर ‘मुठवा’ देवासमोर नृत्य केले जाते. नंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पळसाच्या फुलापासून रंगपंचमीसाठी रंग तयार केला जातो. रंग तयार केलेल्या भांड्यात जोपर्यंत फगवा टाकत नाही, तोपर्यंत रंग खेळला जात नाही. होळी हा सण सतत पाच दिवस साजरा केल्यानंतर पाचव्या दिवशी मात्र एकत्र बसून वर्गणी (फगवा) मोजली जाते. पैशांची व धान्याची मोजणी केल्यानंतर फगवा मागण्यासाठी जी मंडळी होती, त्या मंडळींना एकत्र करून बोकड, कोंबड्या बोलावून त्याचा वाटा करून प्रत्येकाच्या घरात देतात किंवा एकत्र स्वयंपाक करून एकत्रित जेवतात. ही मेळघाटातील होळीची महती आहे.
होळी हा आदिवासी कोरकू बांधवांकरिता महत्त्वाचा सण आहे. लग्नाची बोलणी असो वा मुलांचा संस्कारविधी, सर्व काही यादरम्यान होतात. वेगवेगळ्या दिवशी होळी करून एकत्रित आनंद लुटतात. - डॉ. रोहिणी देशमुख, समाजशास्त्र विभाग, संगा़बा अमरावती विद्यापीठ
पंचायतीत निर्णय कोणत्या गावी हा कार्यक्रम कधी करायचा, यासाठी पंचायत भरते. गावातील पाटील याचा निर्णय देतात. ज्या-ज्या गावातून वर्गणी गोळा केली असेल, त्या-त्या गावातील मंडळीला जेवायला बोलावले जाते.