बॉटम पान २ ची
मोर्शी तालुका : २२ हजार हेक्टरवर उत्पादन, शेतकरी चिंतेत
मोर्शी : तालुक्यातील प्रमुख फळपीक असलेल्या संत्र्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तालुक्यात २२ हजार हेक्टरवर संत्राउत्पादन घेतले जाते. परंतु, एकूण उत्पादनाच्या ४० टक्के संत्री आकाराने लहान असल्याने तसेच या भागामध्ये नागपुरी संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नसल्यामुळे त्याला योग्य भाव मिळत नाही. परिणामी तो एक तर मातीमोल भावाने विकावा लागतो किंवा फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रत्यक्षात अशी संत्री प्रक्रियेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची होळी बेरंग गेली आहे.
विदर्भात एकही प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्राउत्पादक दरवर्षी त्याच समस्यांना तोंड देत आहेत. डिंक्या, कोळशीचा प्रादुर्भाव, तंत्रज्ञानाचा नैसर्गिक आपत्तीचा विळखा, सिंचनाचे नगण्य प्रमाण, एकही प्रक्रिया उद्योग नसणे, निर्यातशून्य धोरण, सदोष फळपीक विमा अशी असंख्य कारणे यासाठी जबाबदार आहेत. काही वर्षांपासून कमी होणाऱ्या पावसाळ्यामुळे उद्भवणारी पाणीटंचाई, नापिकी, दुष्काळ वादळी पाऊस, गारपीट, शेती पिकांवर येणारे रोग, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, यामुळे नापिकी, पाणीटंचाई या सर्व प्रकाराला कंटाळून वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांनी या रंगाचा बेरंग झाला आहे. खेड्यापाड्यांतील भीषण वातावरणाचा रंग चढल्याने शेतकरी, शेतमजुरांच्या आयुष्यातील खरे रंगच नाहीसे झाले आहेत. किंबहुना गरिबी, कुपोषण, दारिद्रय़, महागाई या भेसूर रंगात रंगलेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या वास्तवाचा भयाण रंग अन्य कुठल्याही रंगाने झाकला जाणार नाही, अशी परिस्थिती आहे.
लागोपाठ पाच वर्षांपासून अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला. शिवारात पिकेही जोमदार आली. पण, दराअभावी शेतमाल मातीमोल झाला. मोर्शी तालुका विक्रमी संत्राउत्पादनासाठी प्रसिद्ध असूनही संत्राउत्पादक शेतकऱ्यांना ३५ ते ४० हजार रुपये टन विकली जाणारी संत्री ६ ते १० हजार रुपये टन दराने विकावी लागली. विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे व कोरोनामुळे शेतकरी संकटात आहेत. संत्री, मोसंबी तूर, हरभरा, गहू, मका, कापूस अशा पिकांसाठी उत्पादित माल साठवण करण्याची व्यवस्था व जागा उपलब्ध नसल्याने सर्व बाजूंनी शेतकरी विवंचनेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल नाईलाजाने व्यापाऱ्यांना कमी भावामध्ये विकून गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत.
-----