अमरावती : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शाश्वत शाळेतील एकूण ४० पैकी १० विद्यार्थी पुढील पातळीसाठी निवडले गेले, तर अदिती व-हाडे ही प्रथम क्रमांकाने निवडली गेली. पूर्ण राज्यभरात होमी भाभा परीक्षेचा निकाल सात टक्के लागलेला असतानाच राज्यातील शाश्वत या एकमेव शाळेचा निकाल २५ टक्के लागला आहे. अनुष्का पोटोडे, मृण्मयी जोशी, मधुर लिखमणी, सुबोध कानबाले, श्रेया साकला, मेघना बजाज, प्लक्षा पांडे, राज आचलिया, आदित्य मामर्डे हे विद्यार्थी पुढील पातळीसाठी निवडले गेले आहेत.या परीक्षेसाठी तयारी करताना विद्यार्थ्यांनी कुठल्याही पुस्तकाचा वापर केला नाही किंवा घोकंपट्टी केली नाही. परीक्षेची तयारी करताना शिक्षकांनी खेळाद्वारे विज्ञान शिकविले. नुकतेच शिक्षण नाही तर विज्ञान कसे आत्मसात करावे, यासाठी हा उपक्रम होता. म्हणून या निकालामुळे सगळेजण शाश्वत शिक्षण पद्धतीची दखल घेत आहेत.विद्यार्थ्यांच्या या यशात वैशाली ठाकूर, हिमानी राठी व सरिता खत्री, अनुप्रिया मंडकमारे यांचे मार्गदर्शन लाभले. शाश्वतच्या संस्थापिका अमृता गायगोले यांच्या मार्गदर्शनासोबतच नारायणा आय.आय.टी. अकॅडमी दिल्ली मधील तज्ज्ञ शिक्षक आलोक कुमार, टाटा इन्स्टिट्युटचे माजी शास्त्रज्ञ डॉ. आनंद घैसास याशिवाय संजय पांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करावी या हेतूने शाश्वत शाळेने स्पर्धा परीक्षा विभाग सुरू केला आहे. यात इयत्ता पाचवी व आठवीसाठी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता सहावी व नववीसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, इयत्ता दहावीसाठी एनएसटीएसई परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. यात कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. भारतातील वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी ध्येयपूर्तीसाठी या उपक्रमात जुळलेली आहेत तसेच पालकसुद्धा शिक्षणक्षेत्रातील आमूलाग्र बदलाची सुरुवात म्हणून या उपक्रमाकडे पाहत आहेत.
होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 6:14 PM